
पोलिस भरतीसाठी परीक्षा दोन एप्रिलला
पुणे, ता. १७ : पुणे शहर पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया सुरू असून, इच्छुक उमेदवारांची मैदानी चाचणी शुक्रवारी पूर्ण झाली. त्यानंतर पोलिस शिपाई पदासाठी दोन एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार असल्याची माहिती पोलिस दलाकडून देण्यात आली.
पुणे शहर पोलिस दलासाठी ‘पोलिस भरती-२०२१’ प्रक्रियेस तीन डिसेंबर रोजी प्रारंभ झाला. इच्छुक उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शारीरिक चाचणीसाठी मैदानी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मेरीट यादी पाच-सहा दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस मुख्यालयातील अधिकारी दशरथ हटकर यांनी दिली. दरम्यान, गृह विभागाच्या परिपत्रकानुसार पोलिस चालकपदाची लेखी परीक्षा २६ मार्च रोजी होणार आहे. तर, पोलिस शिपाई पदाची लेखी दोन एप्रिल रोजी घेतली जाणार आहे.
पाच तृतीयपंथीयांचा सहभाग
मुंबई उच्च न्यायालयाने नऊ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या आदेशानंतर तृतीयपंथीयांना पोलिस भरतीमध्ये पर्याय उपलब्ध करून देण्यात आला. पुणे शहर पोलिस दलामध्ये शिपाई आणि चालक भरतीसाठी नऊ तृतीयपंथीयांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु त्यापैकी एका महिला उमेदवाराने चुकून अर्ज भरला होता. तर, उर्वरित आठपैकी पाच तृतीयपंथीयांनी शुक्रवारी (ता. १७) मैदानी परीक्षेत सहभाग घेतल्याची माहिती पोलिस मुख्यालयाकडून देण्यात आली.