
भारताचा दक्षिण आफ्रिकेतील सहभाग वाढता
पुणे, ता. १७ : आफ्रिकेत प्रवासासाठी जाणाऱ्या भारतीयांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढावी म्हणून विशेष प्रयत्न करण्यात आहे. पर्यटनाबरोबरच वाणिज्य, व्यापार आणि व्यावसायिक कारणांसाठी दक्षिण आफ्रिकेला पसंती द्यावी, म्हणून देशभरात विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी एका बैठकीचे आयोजन केले होते.
दक्षिण आफ्रिका पर्यटन विभागाच्या भारताच्या प्रमुख निलिस्वा एनकानी सांगतात, ‘‘भारतीय वाणिज्य जगताचा दक्षिण आफ्रिकेतील सहभाग वाढत चालला आहे. जागतिक बैठका, परिषदांचे यजमानपद भूषविण्याची जबाबदारी दक्षिण आफ्रिका निभावत आहे. भारतासोबतचे आमचे संबंध सौदार्हाचे असून, यावर्षी भारतीय प्रवाशांची संख्या ३५ टक्क्यांनी वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. आमच्या देशाला भेट देणाऱ्या जगभरातील शहरांमध्ये पुणे सहाव्या क्रमांकावर आहे.’’ कोरोनानंतर भारतीयांचे दक्षिण आफ्रिकेला भेट देण्याचे प्रमाण २०० टक्क्यांनी वाढल्याचेही निलिस्वा यांनी सांगितले. तसेच पर्यटकांसह व्यावसायिकांच्या सुलभतेसाठी दक्षिण आफ्रिकेतर्फे विविध पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.