
तिकिट झाले ‘हाफ’ डोक्याचा वाढला ताप!
‘‘अहो, माझं एक फूल तिकीट द्या आणि बायकोचं हाफ तिकीट द्या.’’ आम्ही आनंदाने कंडक्टरला म्हटले. तिचं हाफ तिकीट घेताना आम्हाला एवढा आनंद झाला होता, की आम्ही कंडक्टरला मिठीच मारणार होतो.
‘‘पूर्वीही मला तिचं हाफ तिकीट काढावं, असं तिच्या वागण्यावरून वाटायचं पण डेअरिंग झाली नाही. आता हक्काने तिचं हाफ तिकीट काढू शकतो.’’ आम्ही मिस्कीलपणे कंडक्टरला म्हटले पण कंडक्टरला आमचे बोलणे काही आवडले नसावे.
‘‘तुम्ही दीडशहाणेच दिसताय. त्यामुळे तुम्ही दीड तिकीट घ्या.’’ कंडक्टरनेही माफक विनोद केला.
‘‘अहो तसं करू नका. मला पूर्ण तिकीट आणि बायकोचं हाफ तिकीट द्या. किती? हाफ तिकीट! हाफ तिकीट’’ असे म्हणून आम्ही जोरात हसलो. तेवढ्यात बायकोने आमच्या तोंडावर तांब्याभर पाणी शिंपडलं.
‘बायकोचं हाफ तिकीट द्या’ असे म्हणून झोपेत काय हसताय?’’ शुभांगीने रुद्रावतार धारण केला. आपल्याला पडलेलं हे स्वप्नं होतं, हे पाहून आमचा चेहरा उतरला. आजचा रविवार आम्हाला काय चांगला जाणार नाही, याची आम्हाला कल्पना आली.
‘‘अगं तसं नाही. तुला आता कोठेही निम्म्या तिकिटात फिरता येणार, याचा मला आनंद झालाय. तूच म्हणतेस या महागाईमुळे कोठे फिरायला जाता येत नाही की कसली हौसमौज करता येत नाही. आता सरकारने एवढी सवलत दिली असेल तर तू मागे हटू नकोस. सगळ्या मैत्रिणींनासोबत घेऊन मस्तपैकी फिर.’’ आम्ही बायकोची समजूत घातली. आमचं बोलणं तिला पटलं असावं. मग तिने मैत्रिणीला फोन करून, एसटीने फिरण्याच्या योजना आखली. आता आपल्याला आठवडाभर तरी स्वातंत्र्य मिळणार, या आनंदाने आमचा चेहरा फुलला. आम्ही सरकारचे मनोमन आभार मानले. आम्हीही मित्रांना फोन करून, आठवडाभराच्या पार्टीचे नियोजन केले.
‘‘अहो, फिरायला जाण्यासाठी माझ्याकडे चांगल्या साड्या, ड्रेस नाहीत. चपलाही जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे माझ्याबरोबर तुम्ही शॉपिंगला चला.’’ तिचा आग्रह मला मोडवेना. पुढचे काही दिवस सुखाचे जाणार असल्याने चेहऱ्यावरील आनंद लपवत आम्ही तयार झालो. मॉलमध्ये गेल्यावर मात्र तिने पंधरा हजारांची खरेदी केल्यावर आमचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
आता एसटीच्या तिकिटात फार तर तीन-चारशे रुपये वाचणार होते. मात्र, त्यासाठी पंधरा हजारांची खरेदी झाली होती. नाल फुकट मिळाली म्हणून घोडा खरेदी करण्यासारखाच हा प्रकार होता.
थोड्यावेळाने चेहरा पाडून शुभांगीला म्हणालो, ‘‘तू मैत्रिणींबरोबर फिरायला गेल्यावर मला करमेल का? तुझ्याशिवाय राहायची सवय नाही ना.’’ चेहरा पाडून आम्ही म्हटले.
‘‘तुमची एवढीच अडचण होणार असेल तर मी नाही जात.’’ तिने असं म्हटल्यावर आम्ही गडबडलो. ‘‘अगं तसं नाही, तू बिनधास्त जा. मी कसंतरी ॲडजस्ट करतो.’’ आम्ही घाम पुसत म्हटले. थोड्यावेळाने सासूबाई व त्यांची बहिण मोठ्या बॅगा घेऊन आल्या. दोन्ही सासवांना बघून आमच्या पायाखालची वाळू सरकली.
‘‘अगं शुभांगी, सरकारने एसटीचे तिकीट निम्मं केलंय. म्हटलं चला फायदा घेऊ. तसंही मला घरी करमत नव्हतं. म्हणून आम्ही दोघी तुझ्याकडं आलो. आता तुझ्याकडं दोन दिवस राहून, परत साताऱ्याला जाणार. तिथं एक दिवस राहून, परत तुझ्याकडं दोन-तीन दिवस मुक्कामी येणार. तिकिटाच्या खर्चाचा प्रश्न नसल्याने इथूनपुढे आम्ही दोघी असंच अप-डाऊन करणार. फक्त जावईबापूंना आम्हाला स्वारगेटला सोडायला आणि आणायला पाठवत जा. म्हणजे आम्हाला काही अडचण येणार नाही.’’ सासूबाईंचे बोलणे ऐकून आमच्या घशाला कोरड पडली.