
सूर्यदत्तमध्ये आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा प्रतिसाद
पुणे, ता. १९ : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी व जहांगीर हॉस्पिटल यांच्या वतीने महिला कर्मचाऱ्यांसाठी विनामूल्य सर्वांगीण आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचा १०० पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला.
याप्रसंगी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, अधिष्ठाता प्रा. प्रतीक्षा वाबळे, फिजिओथेरपी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, सूर्यदत्त लॉ कॉलेजच्या प्राचार्य प्रा. केतकी बापट, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वंदना पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. महिला दिन व सूर्यदत्त संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त सूर्यदत्तमध्ये प्रत्येक महिन्याच्या एका दिवशी महिलांसाठी विशेष उपक्रम राबविला जात आहे. शिबिरात वजन, उंची, बीएमआय, रक्त तपासणी, साखरेची तपासणी, नेत्रतपासणी, इलेक्ट्रोकार्डियोग्रॅम आदी तपासण्या केल्या. तसेच ४० वर्षांवरील महिलांची स्तनाच्या कर्करोगासंदर्भातील तपासणी करण्यात आली.