वीज चोरांना महावितरणचा झटका

वीज चोरांना महावितरणचा झटका

पुणे, ता. २२ : महावितरणच्या भरारी पथकाने गेल्या महिन्यात भोसरी, शिरूर व इंदापूर येथे धाड टाकून ८ कोटी ७१ लाख रुपयांच्या ११० वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या. यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच इतर अनियमिततेच्या १०० प्रकरणात चार कोटी २९ लाखांची बिले देण्यात आलेली आहे. उघडकीस आलेल्या वीजचोरीमध्ये मोठया संख्येने स्टोन क्रशर व प्लास्टिक इंडस्ट्री अशा औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या ग्राहकाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

पुणे शहर भागातील भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकून स्टोन क्रशर कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले असून या ग्राहकास ८ लाख ३८ हजार युनिटचे एक कोटी ६६ लाख ९२ हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत शिरूर परिसरात भरारी पथकाने धाड टाकून प्लास्टिक एंडस्ट्रीची वीजचोरी उघडकीस आणली आहे. या औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून ५ लाख ०६ हजार युनिटची वीजचोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून या ग्राहकाला ८५ लाख ३० हजार रूपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.

तिसऱ्या घटनेत इंदापूर परिसरात भरारी पथकाने धाड टाकून आइस फॅक्ट्री कंपनीची वीजचोरी उघडकीस आणली. यात औद्योगिक ग्राहकाने मीटरमध्ये फेरफार करून २ लाख ८५ हजार युनिटची वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. त्याला ५१ लाख ६९ हजार रूपयांचे वीजचोरीचे बिल देण्यात आले आहे.

भरारी पथक स्थापन
महावितरणने मोठ्या प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीविरुद्ध भरारी पथक स्थापन करण्यात आली आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com