
कारची संख्या घटली, दुचाकी सुसाट
पुणे, ता. २२ ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुण्यात १३ हजार नवीन वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाही दुचाकींच्या संख्येत वाढ झाली आहे. नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून आला. शहरातील विविध शोरूममध्ये बुधवारी दिवसभर ग्राहकांची वर्दळ होती. चारचाकींमध्ये ग्राहकांचा हायब्रीड वाहने घेण्याकडे अधिक कल होता.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून नवीन वाहने खरेदीकडे अनेकांचा कल असतो. अनेक वाहनधारक आधीच वाहनांची नोंदणी करून ठेवतात. मात्र, त्या गुढीपाडव्याच्या दिवशी घरी घेऊन जातात. पुणे आरटीओकडे ७ ते २१ मार्च दरम्यान ११ हजार ९६४ वाहन विक्रीची नोंद झाली. यात दुचाकींची संख्या आठ हजार ११ इतकी तर चारचाकींची संख्या दोन हजार ९३३ इतकी आहे. २२ मार्च म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ४६७ दुचाकींची तर २३० चारचाकींची विक्री झाली आहे. सर्व वाहने मिळून यंदा पुणे आरटीओकडे १२ हजार ८४६ वाहनांची नोंद झाली. गेल्यावर्षी १२ हजार ७३ वाहनांची नोंद झाली होती.
दुचाकी व चारचाकी वाहन संख्या :
वर्ष दुचाकी चारचाकी
२०२२ ६,९०० ४,०२०
२०२३ ८,४७८ ३,१६३
चारचाकींची विक्री घटली :
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चारचाकींची विक्री घटली आहे. गेल्यावर्षी या काळात ४,०२० चारचाकींची विक्री झाली होती; यंदा मात्र तीन हजार १६३ चारचाकींची विक्री झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कारची विक्री वाढणे अपेक्षित असताना ती संख्या मात्र घटली आहे तर दुसरीकडे दुचाकींच्या विक्रीत वाढ झाली आहे.
वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली. थेट शोरूममध्ये येऊन गाड्यांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता.
- संतोष पडवाल,
यश होंडा, दुचाकी विक्रेता
चारचाकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांमध्ये चांगलाच उत्साह पाहण्यास मिळाला. गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन चारचाकी खरेदी करण्यासाठी अनेकांनी फेब्रुवारीमध्ये नोंदणी केली होती. चारचाकींमध्ये हायब्रीड वाहनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
- सारंग धांडे,
संचालक, मॅक्स ग्रुप
गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर यंदा सुमारे १३ हजार वाहनांची नोंद झाली आहे. यंदा आरटीओ कार्यालयात नवीन वाहनांच्या नोंदणीसाठी विशेष व्यवस्था केली होती.
- डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे