
... अन् हृदयावरील दडपण झाले दूर
पुणे, ता. २३ : ‘‘इमारतीचे जिने चढताना सत्तरीच्या उंबरठ्यावरील माझ्या काकांना भयंकर दम लागत होता. पाच-सहा पायऱ्या चढल्यानंतर ते अक्षरशः बसायचे. डॉक्टरांनी अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला. चार-पाच खासगी रुग्णालयांत जाऊन चौकशी केल्यावर पंधरा ते वीस हजारांवर खर्च येणार असल्याचे समजले. जेमतेम सहा हजार रुपये निवृत्तिवेतनावर उदरनिर्वाह करणाऱ्या काकांसमोर मोठे संकट उभे ठाकले होते. मात्र महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातून आम्हाला दिलासा मिळाला. तेथे त्यांच्या हृदयाच्या अँजिओग्राफीसाठी आठ ते नऊ हजार रुपयांपर्यंत खर्च आणि तातडीने उपचारही मिळाले, असे रुग्णाचे नातेवाईक चंद्रकांत होले सांगत होते.
‘‘हृदयाचे दुखणे म्हणजे काही लाख रुपये उपचारांसाठी बाजूला काढून ठेवावे लागतात. आजाराच्या फक्त निदानासाठीच पंधरा-वीस लाख रुपये खर्च येत असल्याने काकांवर मोठे दडपण आले होते. महापालिकेने या संकटातून सोडविले,’’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
दृष्टिक्षेपात महापालिकेतील हृदय उपचार
- कमला नेहरू रुग्णालयात ‘पीपीपी’च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांतर्गत २५ सप्टेंबर २०१७ ते १५ मार्च २०२३ पर्यंत हृदयविकाराच्या एक लाख सहा हजार १९९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
- त्यापैकी पाच हजार ४९० रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले.
- उपचारासाठी दाखल केलेल्यांपैकी ७३ टक्के (४००२) रुग्ण हृदयाच्या अँजिओग्राफीसाठी आले होते.
- हृदयातील जवनिका आणि कर्णिका या दोन्ही कप्प्यांची कार्यक्षमता तपासण्याची अद्ययावत (इपी स्टडी २ डी आणि थ्रीडी) सुविधाही येथे आहे.
- शहरातील इतर खासगी रुग्णालयांत बायपासचा खर्च ५ ते ६ लाख रुपये होतो. तो कमला नेहरू रुग्णालयात तीन लाख रुपयांपर्यंत होतो.
- अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी सरकारी दरापेक्षा पाच टक्के कमी खर्चात केली जाते.
पुणेकरांच्या पैशांची बचत
शहरातील खासगी रुग्णालयांत एका अँजिओग्राफीला सरासरी १५ हजार रुपये खर्च येतो. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सुमारे सहा वर्षांत ४ हजार २ रुग्णांची अँजिओग्राफी करण्यात आली आहे. पंधरा हजार रुपयांनी खासगी रुग्णालयात चार हजार २ रुग्णांच्या अँजिओग्राफीचा खर्च सहा कोटी ३० हजार रुपये झाला असता. प्रत्यक्षात कमला नेहरू रुग्णालयात प्रत्येक रुग्णासाठी सुमारे नऊ हजार रुपयांचा खर्च आला. काही रुग्णांना मात्र हा खर्च १० ते ११ हजार रुपयांपर्यंत गेला. सर्व अँजिओग्राफीचा एकत्रित खर्च तीन कोटी ६० लाख १८ हजार रुपये खर्च आला. त्यामुळे पुणेकरांच्या दोन कोटी ४० लाख १२ हजार रुपयांची बचत झाली.
महागडी शस्त्रक्रिया यशस्वी
‘बेंटाल’ या ओपन हार्ट सर्जरीचा खर्च खासगी रुग्णालयात १५ लाख रुपयांपर्यंत येतो. हीच शस्त्रक्रिया महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात सहा लाख रुपयांमध्ये करण्यात आली. आतापर्यंत अशा प्रकारची एकच शस्त्रक्रिया झाली आहे. या उपचार पद्धतीबद्दल जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे, असे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.
तपासणी आणि उपचार ................... रुग्णसंख्या
- ईसीजी ............................... ८०,०००
- ट्रेड मिल टेस्ट (स्ट्रेस टेस्ट)...... १०८३
- २ डी-इको ............................... ७८,८५०
- हृदयाची अँजिओग्राफी ............. ४,००२
- आपत्कालीन अँजिओप्लास्टी ..... २,२०६
- हृदयाची बायपास ..................... ३५३
- पेसमेकर बसविण्याची शस्त्रक्रिया .... २९
(आकडेवारी ः २५ सप्टेंबर २०१७ ते १५ मार्च २०२३ पर्यंतची)
महापालिकेने शहरातील सामान्य नागरिकांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी-सरकारी भागिदारी (पीपीपी) प्रारूप स्वीकारले आहे. हे सगळे प्रकल्प उत्तम पद्धतीने सुरू आहेत. याचा फायदा शहरातील रुग्णांना मिळत आहे. अद्ययावत वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून महागडे आणि गुंतागुंतीचे उपचार कमी खर्चात महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्यप्रमुख, महापालिका