जागा एक लाख, अर्ज साडेतीन लाख!

जागा एक लाख, अर्ज साडेतीन लाख!

पुणे, ता. २६ : शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी तब्बल तीन लाख ६६ हजार ५५३ अर्ज आले आहेत. या जागांवरील प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नाव नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत सोडत (लॉटरी) काढून प्रवेशासाठी बालकांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आरटीईनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया शनिवारी रात्री बारा वाजता संपली. यात राज्यातील आठ हजार ८२८ शाळांमधील एक लाख एक हजार ९६९ जागांसाठी तब्बल तीन लाख ६६ हजार ५५३ अर्ज आले आहेत. पुण्यातील ९३६ शाळांमधील १५ हजार ६५५ जागांसाठी ७७ हजार ९०१ अर्ज आले आहेत.
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत अर्ज भरण्याची सुविधा एक मार्चपासून खुली करून देण्यात आली होती. प्रवेशासाठी अर्ज नोंदणीकरिता प्राथमिक शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर सुरुवातीला पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, शिक्षण विभागाच्या हे लक्षात आल्यानंतर पालकांना बालकांचा अर्ज भरून देण्यासाठी पर्यायी दुसरी लिंक उपलब्ध करून देण्यात आली.
प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात सोडत काढण्यात येईल. या सोडतीत निवड झालेल्या बालकांना त्यांचा अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात येतील. संबंधित निवड झालेल्या बालकांच्या शाळा प्रवेशासाठी ठराविक कालावधी देण्यात येणार आहे.


आलेले अर्ज
जिल्हा : आरटीई शाळा : रिक्त जागा : आलेले एकूण अर्ज
नगर : ३६४ : २,८२५ : ९,८१८
औरंगाबाद : ५४७ : ४,०७३ : २०,८९०
जळगाव : २८२ : ३,१२२ : ११,३१७
नागपूर : ६५३ : ६,५७७ : ३६,६२३
नाशिक : ४०१ : ४,८५४ : २२,१२२
पुणे : ९३६ : १५,६५५ : ७७,९०१
ठाणे : ६२९ : १२,२७८ : ३१,८०४

सोडतीत निवड झाल्यावर असा घ्या प्रवेश
- ‘प्रवेशासाठी निवड झाली’ असा एसएमएस येईल
- त्यानंतर आरटीई पोर्टलवर अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी
- प्रवेश मिळाल्याचा संदेश आल्यावर ॲलॉटमेंट लेटरची प्रिंट काढावी
- ॲलॉटमेंट लेटरवर पडताळणी समितीचा पत्ता असेल, त्याठिकाणी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी
- त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी समितीकडून घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com