
पिस्तूल विक्री प्रकरणी सिंहगड रस्त्यावर एकजण ताब्यात
पुणे, ता. ३ : देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले आहे.
वैभव विजय वाल्हेकर (वय २९, रा. कामथडी, भोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. नऱ्हे भागात एक जण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यातील गस्त घालणारे पोलिस कर्मचारी अमोल तांबे आणि माने यांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून वाल्हेकरला पकडले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. वाल्हेकर पिस्तुलाची विक्री कोणाला करणार होता, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त राजेंद्र पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक राहुल यादव, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, शंकर कुंभार आणि रवींद्र अहिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.