नगर रस्ता "बीआरटी'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नगर रस्ता "बीआरटी''
नगर रस्ता "बीआरटी''

नगर रस्ता "बीआरटी''

sakal_logo
By

प्रतिक्षा नगर रस्त्यावरील बीआरटी अहवालाची
काम पूर्ण होण्याच्या मार्गावर; कोंडी सुटण्याची शक्यता
पुणे, ता. २७ ः नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाची महापालिका प्रशासन व पीएमपीएल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीकडून पाहणी झाली असली तरी अद्याप अहवाल महापालिकेला मिळालेला नाही. "बीआरटी''चे काम काही महिन्यांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. ते पूर्ण झाल्यानंतर पीएमपी बस पुन्हा बीआरटी मार्गाने जाऊ लागल्यास वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याची शक्‍यता आहे.
बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची टीका आमदार सुनील टिंगरे यांनी केली होती. याबाबत त्यांनी विधानसभा अधिवेशनातही प्रश्‍न उपस्थित केला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संबंधित रस्त्याची पाहणी करून बीआरटीच्या विरोधात भाष्य केले होते. बीआरटीमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. पावसाच्या पाण्यालाही अडथळा होतो आहे, अशी टीका केली जात होती.
दरम्यान, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर हा प्रश्‍न सोडविण्यासाठी संयुक्त समितीकडून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार, मे महिन्यात पीएमपीएलकडून मालमत्ता विभागाचे प्रमुख अनंत वाघमारे, बीआरटी व्यवस्थापक, फिल्ड ऑफिसर तर महापालिका प्रशासनाकडून कार्यकारी अभियंता संजय धाराव, कॉरिडॉर इंजिनीयर यांचा समावेश असलेल्या समितीने मार्गाची पाहणी केली. त्यानंतर पीएमपीएलकडून अभिप्राय नोंदवून त्याचा अहवाल महापालिकेला देण्यात येणार होता, मात्र तो अद्याप आलेला नाही.
"पीएमपीएल'' प्रशासनाने यापूर्वीच बीआरटी मार्ग काढू नये, अशी भूमिका घेतली होती. मेट्रोच्या कामामुळे बीआरटी मार्ग केवळ चार बसथांब्यांच्या ठिकाणी बंद आहे. त्यामुळे याच ठिकाणी पीएमपी बस मुख्य रस्त्यावर येऊन वाहतूक कोंडीत भर पडते. येत्या पाच ते सहा महिन्यांत तेथील मेट्रोचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर बीआरटीचा सध्या बंद असलेला मार्ग पुन्हा सुरु झाल्यानंतर बस पूर्वीप्रमाणे बीआरटी मार्गातून जातील, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. त्याचबरोबर पुन्हा एकदा या मार्गावरील बस प्रवासाची वेळ देखील कमी होईल, असे पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
---
नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गाच्या संयुक्त पाहणीचा अहवाल अद्याप आलेला नाही. येत्या काही दिवसांत अहवाल येईल.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
-----