कोट्यवधींची ‘उड्डाणे’; पुलांखाली अस्वच्छता

कोट्यवधींची ‘उड्डाणे’; पुलांखाली अस्वच्छता

पुणे, ता. ६ ः पुणे शहरात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपुलांवर रंगरंगोटी, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई केली जात आहे. मात्र, उड्डाणपुलांखालील स्थिती अतिशय विदारक असून प्रचंड अस्वच्छता, भंगार व्यावसायिकांसह इतरांनी सुरू केलेला जागेचा वापर, अनेकांकडून होत असलेल्या अतिक्रमणांमुळे ही ठिकाणे शहराच्या विद्रूपीकरणात भर घालत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

धोरण अद्यापही अभाव
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तसेच महत्त्वाच्या चौकांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेने अनेक उड्डाणपूल बांधले आहेत. सद्यःस्थितीत शहरात १३ उड्डाणपूल आहेत. पण उड्डाणपूल बांधल्यानंतर त्याच्या खालील मोकळ्या जागेचा वापर कसा करावा, याचे धोरण अद्याप निश्‍चीत होऊ शकलेले नाही.

फेरयाचिका दाखल
मुंबई महापालिकेने उड्डाणपुलाखाली पार्किंग केल्याने याविरोधात काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘पार्किंग करता येणार नाही; पण सुशोभीकरण करता येईल,’ असा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, यासाठी फेरयाचिका दाखल केली आहे. पण, त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे पुणे महापालिकेला उड्डाणपुलांच्या खालील जागेच्या वापराचे धोरण निश्‍चित करता आलेले नाही.

शहरातील उड्डाणपूल
- गाडीतळ (हडपसर)
- मगरपट्टा
- सेव्हन लव्हज चौक
- डायस प्लॉट
- जेधे चौक (स्वारगेट)
- शंकर महाराज उड्डाणपूल (सातारा रस्ता)
- नळ स्टॉप (कर्वे रस्ता)
- कर्वेनगर
- पौड फाटा
- सीओईपी
- कृषी महाविद्यालय
- येरवडा
- धायरी फाटा

‘जी २०’साठी १० कोटींचा निधी
जानेवारी महिन्यात झालेल्या ‘जी २०’ परिषदेसाठी सरकारने उड्डाणपुलांच्या रंगकामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता. आता जून महिन्यात होणाऱ्या परिषदेसाठी १० कोटी रुपये मंजूर केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळत असताना केवळ रंगकाम केले जात आहे. मात्र, स्वच्छता राखली जात नाही.

क्षेत्रीय कार्यालयांचे दुर्लक्ष
उड्डाणपुलांखालील जागा वापराचे धोरण नसले तरी हा भाग स्वच्छ ठेवणे आवश्‍यक आहे. शहरातील रस्ते, मोकळ्या जागा स्वच्छ ठेवण्यासह अतिक्रमणांवर कारवाईची जबाबदारी महापालिकेवर आहे. पण, त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सतीश जाधव यांनी केला आहे.

‘जी २०’च्या निमित्ताने शहरांमध्ये स्वच्छतेची कामे सुरू आहेत. अतिरिक्त मनुष्यबळ देऊन उड्डाणपुलाखालील भाग स्वच्छ ठेवण्यात येईल. त्यानुसार आदेश दिला जाईल.
- डॉ. कुणाल खेमनार,
अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

चला स्वच्छतेची ज्योत
आता मिरवायची आहे
शहरे स्वच्छतेची हमी
आपल्या सर्वांची आहे
आपलं शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे प्रशासनच दुर्लक्ष करत असेल तर कोट्यवधींचा निधी पाण्यात जाण्याची शक्यता असते. याबाबत आपले मत मांडा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com