
‘जी २०’च्या नावाने ‘होऊ द्या खर्च’!
पुणे, ता. ७ ः पुणे महापालिकेला राज्य सरकारतर्फे ‘जी २०’ परिषदेसाठी सुशोभीकरणासाठी मोठा निधी देण्यात आला आहे. पण महापालिकेने त्याची उधळपट्टी सुरू केली आहे. सहा महिन्यांपूर्वी सुमारे ७० लाख रुपये खर्च करून लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्त्यावर शोभेची रोपटे लावण्यात आले होते. आता ही रोपटे काढून टाकून त्याच्या ठिकाणी नवीन रोपटे लावण्यास सुरवात केली आहे. तसेच शहरातील इतर चार रस्त्यांवर कुंड्यांमध्ये चक्क परदेशी जातीची झाडे लावण्यासाठी तब्बल तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
पुणे शहरात जून महिन्यात ‘जी २०’च्या दोन बैठका होणार आहेत. त्यासाठीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. राज्य सरकारने ‘जी २०’च्या कामासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये सुशोभीकरणावर मोठा भर आहे. रस्ता दुभाजकांमधील छाटणी, नव्या रोपट्यांची लागवड करणे, सुशोभीकरण करणे यासाठी तीन कोटी रुपये आले आहेत. ‘जी २०’ च्या इव्हेंट मॅनेजमेंटसाठी सहा कोटी रुपये दिले आहेत. त्यामधूनही उद्यानासंदर्भातील कामे केली जात आहेत.
अंदाज समितीपासून पळवाट
‘जी २०’साठी पुणे शहरातील नगर रस्ता, सोलापूर रस्ता, पाषाण रस्ता, खराडी बायपास ते सोलापूर रस्ता, बाणेर रस्ता या पाच रस्त्यांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये रंग देणे, रस्ते दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती, उड्डाणपुलांचे काम आदीचा समावेश आहे. उद्यान विभागाकडून या पाच रस्त्यांवरील उड्डाणपूल आणि रस्त्यांवर कुंड्या ठेवण्यासाठी दोन निविदा काढण्यात आल्या आहेत. यासाठी एक कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये एक हजार ७९० मोठ्या कुंड्या आणि एक हजार ७९० मोठी परदेशी शोभेचे झाडे लावली जाणार आहेत. हे कामे एकच असताना उद्यान विभागाने कुंड्यांसाठी ४९ लाख ९६ हजार आणि झाडांसाठी ४९ लाख २२ हजार रुपयांच्या स्वतंत्र निविदा काढल्या आहेत. ५० लाखाच्या पुढे निविदा गेली असती तर त्यास अंदाज समितीची (इस्टिमेट कमिटीच) मान्यता घ्यावी लागली असती. त्यासाठी यातून पळवाट काढण्यात आली आहे.
एका झूडपासाठी हजारापेक्षा जास्त दर
पुणे महापालिका झुडूप प्रकारातील झाडे सुशोभीकरणासाठी लावणार आहे. त्यामध्ये फॉक्सटेल प्लामची २०० झाडे लावली जाणार असून, प्रत्येक झाडाची किंमत एक हजार ८०० रुपये इतकी आहे. त्याच प्रमाणे रॅफिस प्लाम १०० झाडासाठी प्रति झाड चार हजार, बोगन वेलची २०० झाडे लावली जाणार असून, प्रति झाड पाच हजार, फिक्स स्टार लाइट २५० झाडे लावली जातील, प्रति झाड चार हजार रुपये, फिक्स ब्लॅक २५० झाडे असतील, त्याची प्रति झाड पाच हजार रुपये किंमत आहे. तर अॅरका प्लॉम याची २८० झाडे लावली जाणार आहेत. त्याची प्रति झाड ८०० रुपये किंमत असणार आहे. यावरील जीएसटीसह तब्बल ४९ लाख ९६ हजार रुपये खर्च केले जातील. याचे कागदपत्र ‘सकाळ’कडे उपलब्ध आहेत.
जी २० परिषदेसाठी सरकारकडून निधी आला आहे. त्यातून दुभाजक, उड्डाणपूल यांच्यावर सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. यापूर्वीच्या जी २० परिषदेसाठी दुभाजकात लावण्यात आलेली झाडे ही सिझनल होती, त्यामुळे त्यांचे आयुष्य संपलेले आहे. ती झाडे काढून नवीन शोभेची झाडे लावली जात आहे. तसेच पाच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या कुंड्यांमध्ये झुडूप जात प्रकारातील विविध झाडे लावले जाणार आहेत.
- अशोक घोरपडे, अधिक्षक उद्यान विभाग