कारावाई

कारावाई
Published on

पुणे महापालिकेला अखेर जाग; ४५७ जणांकडून एक लाख ३६ दंड वसूल
उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरद्ध मोहीम

पुणे, ता. २८ ः पुणे शहरात उघड्यावर कचरा टाकून व जाळून हवा प्रदूषणात भर पाडणाऱ्या ४५७ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख ३६ हजार ७७० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पुणे महापालिकेने एका दिवसात ही कारवाई केली. दरम्यान, कचरा जाळणाऱ्यांवर महापालिका कारवाई करत नसल्याचे वृत्त ‘सकाळ’ने मंगळवारी प्रकाशित केल्यानंतर कारवाईचा वेग वाढला आहे.
हिवाळ्यामध्ये दिल्ली, मुंबई यासह इतर शहरांमधील स्थिती हवेची चिंताजनक झाली आहे. मोठ्या शहरांमधील हवा प्रदूषण कमी करावे यासाठी केंद्र व राज्य सरकारने नियमावली तयार केली आहे. याची अंमलबजावणी पुणे महापालिकेकडून केली जात आहे. शहरातील बांधकामे, विविध विकास प्रकल्प, वाहनांचा धूर, कचरा जाळणे आदी कारणांमुळे हवा प्रदूषण वाढत आहे. बांधकामांना नोटीस बजावल्या जात असल्या तरी नदीपात्र, विविध घाट, पूल, नाले, राष्ट्रीय महामार्ग, कॅनॉलमध्ये कचरा टाकण्याचे आणि जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पण अशा ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभाग व क्षेत्रीय कार्यालयांकडून दंडात्मक कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. दिवसभरात तीन ते चार जणांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर व जाळणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
याबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर खडबडून झालेल्या प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवला. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये घरातील, दुकानातील कचरा कचरा वेचकांकडे न देता उघड्यावर फेकून देणाऱ्या नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली. ४२४ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून एक लाख १९ हजार ७७० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर कचरा जाळणाऱ्या ३३ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. नोव्हेंबर २०२३ या महिन्यात एका दिवसात केलेल्या कारवाईचा हा सर्वांत मोठा आकडा आहे.

पुणे शहरात नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये व जाळू नये यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. पण नागरिक नियमांचे उल्लंघन करून शहर घाण व प्रदूषित करण्यास हातभार लावत असतील तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, लघुशंका करणे, कचरा जाळणे, उघड्यावर कचरा टाकणे, कचरा वर्गीकरण न करणे यासह इतर कारणासाठी कारवाईचा जोर वाढवला आहे.
- संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

अशी केली कारवाई
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - २८
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे - ९
कचरा जाळणे - ३३
उघड्यावर कचरा टाकणे - ४२४
कचरा वर्गीकरण न करणे - १४
राडारोडा टाकणे - ६
प्लास्टिकचा वापर -१३
एकूण नागरिकांवर कारवाई - ७२७
दंडाची एकूण रक्कम - २,५८,४१०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com