

आरटीओतील दलालाकडून
सहाजणांना साडेसात लाखांना गंडा
पुणे, ता. २८ : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम करून देण्याचे आमिष दाखवून दलालाने सहाजणांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिलिंद मधुकर भोकरे (रा. स्वारगेट) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी युवराज भिवाजी टकले (वय ४२, रा. रोहन अभिलाषा सोसायटी, वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टकले यांनी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीचा खासगी वापर करण्यासाठी आरटीओ कार्यालयात जुलै महिन्यात अर्ज दिला होता. आरटीओ कार्यालयातील सर्व प्रक्रिया करून देतो, असे सांगून भोकरेने टकले यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपये घेतले. त्यांच्याकडून वाहनाची कागदपत्रेही घेतली. परंतु त्यांचे काम न करता पैसे देण्यास टाळाटाळ केली. याबाबत टकले यांनी पोलिसांत तक्रार दिली. चौकशीदरम्यान, भोकरेने टकले यांच्यासह इतर पाच जणांची सात लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक
पुणे : खासगी शिकवणीसाठी जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ३५ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी खासगी शिकवणीसाठी जात असताना हा तरुण तिचा दररोज पाठलाग करीत होता. सोशल मीडियावर तिला मेसेज पाठवत होता. मुलीने त्याला मेसेज पाठवू नकोस, असे सांगितल्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तसेच हा प्रकार घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर तरुणाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पीएमपी बसने महिलेला फरफटत नेले
पुणे : पीएमपी बसमध्ये महिला चढत असताना चालकाने बसचा वेग वाढवल्याने महिलेला फरफटत गेली. ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील लाल देऊळ बसस्थानकाजवळ सोमवारी घडली. शमशुमनिसा हुसेन खान (वय ५७, रा. जुना मोदीखाना) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही पीएमपी बस कोंढव्यातून पुणे स्टेशनकडे जात होती. बस लाल देऊळ बसस्थानकावर थांबल्यानंतर ही महिला बसमध्ये चढत होती. त्यावेळी चालकाने महिलेकडे दुर्लक्ष करून अचानक बसचा वेग वाढवला. काही अंतरापर्यंत महिलेला फरफटत नेले. त्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली. चालक कानात हेडफोन घालून बस चालवत होता. पोलिस बसचालकाचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.