सावित्रीबाई फुले जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबाई फुले जयंती
सावित्रीबाई फुले जयंती

सावित्रीबाई फुले जयंती

sakal_logo
By

सावित्रीबाईंकडे बघताना...


सावित्रीबाई फुले या सात अक्षरात आहे शिक्षणाची महती...स्त्रीची प्रगती...शिकून काय करायचं, इथंपासून शिक्षणाशिवाय आयुष्य निरर्थक इतका विशाल प्रवास स्त्रियांनी साकारला, त्यामागं सावित्रीमाईंचे अतुल्य कार्य आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रीया सावित्रीबाईंच्या कार्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, याचा धांडोळा...
- छाया काविरे


१) दिव्या संजय कांबळे
स्त्रीशिक्षण काळाची गरज

‘‘माझ्या दृष्टिकोनातून शिक्षण हे एक शस्त्र आहे! या समाजातील अजूनही मागास असलेली विचारसरणी, अंधश्रद्धा, जातिव्यवस्था, अनिष्ठ रूढी-परंपरा यांविरुद्ध या ‘शस्त्रा’द्वारे आपण लढू शकतो. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही. आजची स्त्री शिक्षणाच्या जोरावर बाहेर पडू शकते, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते, शिक्षणामुळे ती आज प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे,’’ हे मत आहे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी पुण्यात राहणाऱ्या (मूळ-उस्मानाबाद) तेवीस वर्षीय दिव्या संजय कांबळे हिचे.

दिव्या म्हणते : ‘‘सावित्रीमाईंच्या अथक प्रयत्नांनंतरही आजसुद्धा समाजातल्या काही घटकांच्या सडक्या मानसिकतेमुळे मुलींना पंख असूनही भरारी घेता येत नाही, क्षमता असूनही ती दाखवण्याची संधी मिळत नाही. समाजातील विकृत घटकांमुळे मुलींवर बंधने लादली जातात. ग्रामीण भागातल्या अशा बऱ्याच मुली आहेत, ज्या शिक्षणासाठी आजही घरच्यांशी माझ्यासारख्याच लढत आहेत, तर काही जणी घरच्यांच्या मागास विचारसरणीला बळी पडून आपल्या स्वप्नांवर पाणी सोडत आहेत. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे. आर्थिक परावलंबन व्यक्तीला दुबळे करून व्यक्तीचा कणाच पोकळ करून टाकते, त्यामुळे प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंब होणे गरजेचे आहे. त्यात मीही स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, नोकरीसाठी खूप धडपड करावी लागते.’’

‘‘सावित्रीबाई फुले यांचे काम आणि माहिती मी शालेय पुस्तकांमधून, तसेच शिक्षकांकडून ऐकले होते. स्त्रीशिक्षण ही काळाची गरज आहे, शिक्षणाअभावी मी आज कुठे असते याचा विचार करून अंगावर अक्षरशः शहारे येतात. आजची महिला स्वतंत्र झाली, सुरक्षित झाली असे जरी वाटत असले तरी तिला आजही बुरसटलेल्या विचारांना तोंड द्यावे लागत आहे, ’’ दिव्याने आजच्या वास्तवाकडेही लक्ष वेधले.

‘‘शिक्षणाअभावी असलेली महिला आणि सुशिक्षित महिला या दोघींमध्ये खूप फरक जाणवतो मला. उदाहरणच पाहायला गेलं तर, माझीच आई काही वेळा अंधश्रद्धेला बळी पडताना दिसते, तसेच समाजात लोक काय म्हणतील, आपल्याला ज्या समाजात राहायचे आहे त्यांच्यानुसार चालावं लागेल, त्यांचा विचार करावा लागेल यांसारख्या बुरसटलेल्या विचारांना बळी पडताना तिला मी पाहिले आहे. आजही ग्रामीण भागातील ज्या बायका अशिक्षित आहेत त्या त्यांच्या मुलींचं लग्न कमी वयात करून टाकतात. मुलींचा विचार न करता समाजाचा विचार त्या करतात. माझ्याच चुलतबहिणींच्या बाबतीतली गोष्ट. त्यांचे फार कमी वयात लग्न झाले. कमी शिक्षणाअभावी त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, मग त्या समस्या मानसिक असतील, शारीरिक असतील आणि आर्थिकसुद्धा.

मुलगी हे परक्याचे धन मानले जाते आणि लग्न लावून देऊन हे ‘डोक्यावरचे ओझे’ हलके केले जाते. हाच तो फरक असतो सुशिक्षित महिलांमध्ये आणि शिक्षणाअभावी राहिलेल्या महिलांमध्ये. आपल्या मुलीचे भले कशात आहे, हे शिक्षणापासून वंचित राहिलेली महिला आपल्या पतीला समजावून सांगू शकत नाही. पितृप्रधान संस्कृती आजही ग्रामीण भागात पाहायला मिळते, मी अशी बरीच उदाहरणे पाहिलेली आहेत.

२) प्रेमा मारवाडी
शिक्षणामुळे आचार, विचाराने समृद्ध

‘‘लग्नानंतर काही काळ मी नोकरी केली; पण मुलांना पाळणाघरात ठेवून नोकरी करणे हे मला जिकिरीचे वाटले. शिवाय, मुलींना शिकवण्याची सावित्रीबाईंची तळमळ मला अभ्यासक्रमातून माहीत होती. त्यामुळे निदान आपण आपल्या दोन्ही मुलींना तरी उच्चशिक्षित करावे असे मला वाटले. म्हणून मी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला,’’ प्रेमा अर्जुन मारवाडी यांचं हे मनोगत.
सिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या प्रेमा यांनी गरवारे महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. त्यांच्या थोरल्या मुलीने इंजिनिअरिंगमध्ये ‘मास्टर्स’ केले असून ती सध्या जर्मनीमध्ये सिमेन्स कंपनीत सीनिअर मॅनेजर आहे, तर धाकट्या मुलीने लंडनमध्ये डिजिटल मीडियामध्ये ‘मास्टर्स’ केले असून ती सध्या मुंबईत ‘साची अँड साची’ या कंपनीमध्ये सीनिअर कन्टेंट-रायटर आहे.
प्रेमा म्हणतात : ‘‘मुली मोठ्या झाल्यावर मी पुढे शिक्षण किंवा नोकरी करू शकत होते; पण मध्ये बराच काळ लोटला होता, त्यामुळे परत शिक्षण घ्यावे किंवा नोकरी करावी असा आत्मविश्वास माझ्यात राहिला नव्हता. शिवाय, पूर्ण लक्ष मुलींच्या शिक्षणाकडे असावे म्हणूनही मी नोकरीचा विचार टाळला.’’
‘‘सावित्रीबाईंची माहिती मला फुलेवाड्यामुळे होतीच; पण लहानपणी सावित्रीबाईंबद्दल वाचून, चित्रपट पाहून मला त्यांच्या अधिक जवळ जाता आलं. शिक्षण घेतल्यामुळे माणूस आचाराने व विचाराने समृद्ध होतो, ही सावित्रीबाईंची शिकवण मला मिळाली,’’ प्रेमा सांगतात.
त्या पुढे म्हणतात, ‘‘केवळ कागदोपत्री शिक्षणच महत्त्वाचे आहे असे मला वाटत नाही; कारण, आपल्या सभोवतालचा परिसर, माणसे व त्यांचे वागणे बघूनही आपण शिकत असतो. मात्र, कागदोपत्री शिक्षणही आजच्या काळात गरजेचेच आहे. माझ्या घरी कामवाल्या महिला आहेत. त्यांना लिहिता-वाचता येत नाही व डिजिटल-व्यवहारही कळतं नाही. म्हणून, त्यांना इतर लोकांवर अवलंबून राहावे लागते याची खंत त्या महिलांना वाटते; मात्र, अशीच परिस्थिती आपल्या मुलींची होऊ नये म्हणून त्या जिद्दीने मोलमजुरी करतात आणि पैसे कमावून सगळ्या अपत्यांना उच्चशिक्षित करण्याचा ध्यास करतात. ’’
सावित्रीबाईंनी लावलेल्या रोपाचे आता इतक्या मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालंय की, आज तळागाळातील महिलेलाही शिक्षणाची आंच आहे, तळमळ आहे. सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच आज महिलांमध्ये शिक्षण रुजलंय...


३) सावित्रीबाई विनायक पवार
शिक्षणातून महिलांना प्रतिष्ठापूर्ण जीवन

‘‘माझं शिक्षण झालेलं नव्हतं म्हणून मला आयुष्यभर सफाई कर्मचारी म्हणूनच काम करावं लागलं; पण आज माझी नात ज्योती रिटे शिकून नोकरी करते. तिने आता स्वतःच्या पैशातून घरही घेतले आहे. शिक्षणामुळे आज ज्योतीला आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा आहे, जे पूर्वी आम्हा महिलांना अजिबातच नव्हतं,’’ सत्तरवर्षीय सावित्रीबाई विनायक पवार सांगत होत्या.
सावित्रीबाईंना बालपणापासूनच शिक्षणाची आवड. घरात सर्वात थोरल्या म्हणून धाकट्या भावंडांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली. सावित्रीबाई नाना पेठेतल्या रहिवासी. तेरा वर्षांच्या असताना त्यांचं लग्न झालं. सासर गंज पेठेतलं. सासरची परिस्थिती हालाखीची. सभोवतालच्या लोकांची वृत्ती संकुचित आणि नोकरी मिळेल इतपत स्वतःचं शिक्षण नाही, त्यामुळे लग्नानंतर सहा महिन्यांतच सावित्रीबाईंना काम शोधावं लागलं. महानगरपालिकेत झाडू मारण्याचं काम मिळालं, तेही बदली कामगार म्हणून. सव्वातीन रुपये रोज याप्रमाणे महिन्यातून तीन-चार दिवसच हे काम असे.

सावित्रीबाई सांगतात ः ‘‘नितीन पवार यांनी १९९०-९१ मध्ये नागरवस्ती विकासाच्या कार्यक्रमांतर्गत माझ्यासारख्या महिलांना अक्षरओळख व्हावी म्हणून एक उपक्रम सुरू केला. त्या उपक्रमामुळे माझ्यासारख्या अनेक जणी स्वतःची सही करायला शिकल्या. अक्षरओळख झाल्यामुळे मी वृत्तपत्र वाचू लागले. आधी शहरातल्या शहरात प्रवास करणंही कठीण वाटायचं; कारण, बसच्या पाट्याही वाचता येत नसत; पण अक्षरओळख झाल्यानंतर मी एकटीही प्रवास करू लागले.’’
‘‘मी तेरा वर्षांची असल्यापासून नऊवारी साडी नेसू लागले. घरातील पुरुषांना प्रत्युत्तर देणं म्हणजे गुन्हा मानला जायचा; पण माझी सुशिक्षित सून आता ड्रेस घालते. तिच्या लग्नानंतर तिने ड्रेस घातला म्हणून माझ्या दिराने तिला अपमानास्पद वागणूक दिली; पण ‘मी काय घालायचे हे माझे स्वातंत्र्य आहे,’ असे तिने ठणकावून सांगितले. तिच्यात इतका आत्मविश्वास का होता? कारण, तिचे शिक्षण झालेले होते,’’ सुनेविषयीचा अभिमान सावित्रीबाईंच्या बोलण्यातून झळकत होता.
जुन्या आठवणींत रमताना सावित्राबाई म्हणाल्या ः ‘‘आमचं घर गंज पेठेत महात्मा फुलेवाड्याजवळ होतं. घरातील कामे आटोपली की दुपारी आम्ही बायका फुलेवाड्यावर गप्पा मारत बसायचो. त्या वेळी तिथं आत्ताच्या सारखे स्मारक वगैरे नव्हतं. फक्त एक जुनं झाड, सार्वजनिक नळ आणि महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी खुला केलेला हौद होता. तिथे त्या झाडाखाली बसले की फार प्रसन्न वाटायचे. फुलेदांपत्याच्या कर्तृत्वाविषयीच्या माहितीचे तिथे लावलेले फलक मी वाचत असे. फुलेदांपत्याने शिक्षणासाठी व महिलांसाठी केलेल्या कामाबद्दल परिसरातल्या बायकांना मी माहिती देत असे.

‘‘माझं कागदोपत्री शिक्षण फार झालेलं नाही; पण मला आज जी अक्षरओळख सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झाली आहे त्यामुळे मी आत्मविश्वासाने जगू शकले. शिक्षणातून महिलांना प्रतिष्ठापूर्ण जीवन मिळते,’’ सावित्रीबाई म्हणाल्या.