
पीएमपी ४७२; फेऱ्या १० हजार
पुणे, ता. २ ः कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पीएमपीची बस सेवा देण्यात आली. पीएमपीने ३१ डिसेंबर संध्याकाळी सहा वाजल्यापासून बस सेवा सुरु केली. ती एक जानेवारीच्या रात्री ११ वाजेपर्यंतच सुरूच होती. पीएमपीने अव्याहतपणे २९ तास सेवा दिली. २९ तासांत ४७२ बसच्या सुमारे १० हजार फेऱ्या झाल्या. यातून सुमारे सहा लाख प्रवाशांची वाहतूक झाली. तर पीएमपीला जिल्हा प्रशासनाने या सेवेसाठी ६२ लाख रुपये दिले.
पीएमपी प्रशासनाने लोणीकंद कुस्ती मैदान, वढू फाटा ते वढू व तोरणा हॉटेल शिक्रापूर रोड ते कोरेगाव भीमा या मार्गावर तसेच लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोल नाका या दरम्यान विना तिकीट सेवा दिली. दुपारनंतर नागरिकांच्या गर्दी वाढत गेली. त्यामुळे पीएमपी ने पिंपरी चिंचवडहून जादाच्या २२ बस आणण्यात आल्या. ४७२ बसच्या माध्यमातून सुमारे सहा लाख प्रवाशांची वाहतूक झाली.
पीएमपीला ५३ लाख मिळणे बाकी
जानेवारी २०१९ व जानेवारी २०२० या दोन वर्षी पीएमपीने विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासी सेवा दिली. त्या बदल्यात जिल्हा प्रशासन पीएमपीचे सुमारे ५३ लाख रुपये देणे लागते. ही रक्कम अद्याप पीएमपी प्रशासनाला मिळालेली नाही. आर्थिक तोट्यात असलेल्या पीएमपीला ही रक्कम मिळणे गरजेचे आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे.
पीएमपीची ‘धाव’
विना तिकीट बस : ३८२
तिकीट असलेले बस : ९०
एकूण फेऱ्या : १० हजार
एकूण कर्मचारी : ८५०
अधिकारी : २५
नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सतत २९ तास सेवा दिली. यातून सहा लाख प्रवाशांची वाहतूक झाली. ६२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल, पुणे