विद्यांजली योजनेंतर्गत ७५ शाळांना मदतीचा हात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यांजली योजनेंतर्गत ७५ शाळांना मदतीचा हात
विद्यांजली योजनेंतर्गत ७५ शाळांना मदतीचा हात

विद्यांजली योजनेंतर्गत ७५ शाळांना मदतीचा हात

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : दक्षिण मुख्यालयाच्यावतीने ‘विद्यांजली’ या योजनेंतर्गत ७५ शाळांसोबत भागीदारी करत त्यांना मदतीचा हात देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जोडल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने व कार्यक्रम आयोजित करणे तसेच त्यांना सशस्त्र दलांमध्ये दाखल होण्यासाठी प्रोत्साहन केले जाईल.

सामुदायिक आणि खासगी क्षेत्राच्या सहभागाने शाळांना बळकटी देण्यासाठी पंतप्रधानांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू केलेल्या विद्यांजली योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलांच्या दक्षिण मुख्यालयाने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून दक्षिण मुख्यालयांतर्गत येणाऱ्या निवडक शाळांसोबत हा सत्युत्य कार्यक्रम सुरू केला आहे. यंदा ७५ वा लष्कर दिन साजरा होत असून देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या स्‍मरणार्थ अमृत महोत्सव उत्सव सुरू ठेवण्यासाठी ७५ शाळांची निवड केली आहे. या उपक्रमाची सुरवात शुक्रवारपासून (ता. ६) करण्यात येणार आहे. यासाठी ३० आर्मी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकांद्वारे ७५ शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये निवडलेल्या शाळांना पुस्तके, वाचन साहित्य उपलब्ध करणे, लष्करी डॉक्टरांची वैद्यकीय शिबिरे, योग, शारीरिक शिक्षण वर्ग, क्रीडा स्पर्धा आदींचा समावेश आहे.

दरम्यान लष्कर दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांच्या श्रेणीतील ‘विद्याजंली’ हे चौथे उपक्रम आता दक्षिण मुख्यालयातर्फे राबविण्यात येत आहे. हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. तसेच निवडलेल्या शाळांचे शिक्षण, पायाभूत सुविधा आणि सुविधांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न लष्कराद्वारे केला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना सशस्त्रदलातील विविध संधींबाबत माहिती देत देशसेवेची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जाईल.