भारतीय सैन्यदल मानवतावादी कार्यातही अग्रेसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय सैन्यदल मानवतावादी कार्यातही अग्रेसर
भारतीय सैन्यदल मानवतावादी कार्यातही अग्रेसर

भारतीय सैन्यदल मानवतावादी कार्यातही अग्रेसर

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘‘भारतीय सैन्यदल देशसेवेसाठी सीमारक्षण, युद्धभूमीवर पराक्रम गाजविण्याबरोबर मानवतावादी कार्यातही पुढाकार घेत आहे. दुष्काळ, पूर, वादळ, भूकंप अशा विविध नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास नागरिकांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असते. इतकेच नाही तर सैन्यदलाला मिळणाऱ्या तरतुदीतील ३७.४ टक्के निधी हा अशा प्रकारच्या मानवतावादी कार्यांसाठी देशातच वापरला जातो.’’ असे मत सैन्यदलाच्या दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल मनजित कुमार यांनी व्यक्त केले.
लष्करी दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून शुक्रवारी (ता. ६) ‘विद्यांजली’ योजनेंतर्गत दक्षिण मुख्यालयाद्वारे ७५ शाळांना मदतीचा हात देण्यात आला. त्याच अनुषंगाने पुणे छावणी परिषदेच्या घोरपडी व्हिलेज हाय स्कूल येथे या उपक्रमाच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. विद्यांजली योजनेंतर्गत पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलच्या (एपीएस) साहाय्याने निवडक शाळांना दत्तक घेत त्यांना मदत केली जाईल. या प्रसंगी घोरपडी आर्मी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता शर्मा, घोरपडी व्हिलेज हाय स्कूलच्या मुख्याध्यापिका गायत्री ढेकणे, इतर लष्करी अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी एपीएसच्या विद्यार्थ्यांनी नाटक, योग सादर केले. तसेच एपीएसकडून दत्तक घेतलेल्या शाळेला क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.

लेफ्टनंट जनरल कुमार म्हणाले, ‘‘देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना या ७५ वर्षांमध्ये देशाने अनेक उपलब्ध्या मिळविल्या आहेत. तर येत्या २५ वर्षांमध्ये स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या काळात देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून तुम्हा विद्यार्थांची भूमिका असेल. त्यामुळे देशाच्या भविष्याच्या अनुषंगाने ‘विद्यांजली’ कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत शिक्षण प्रणालीत आधुनिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील शिक्षणासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे.’’

जुन्या आठवणींना उजाळा
पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) जेव्हा दाखल झालो, तेव्हा सुरवातीच्या काळात घोरपडी येथे काही दिवसांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे आज पुन्हा येथे येऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी असे स्तुत्य उपक्रम राबविताना आनंद तर होत आहे. तसेच जुन्या आठवणी ही पुन्हा डोळ्या समोर आल्या. पूर्वी इंजिनिअर, डॉक्टर, लष्कर असे काही ठराविक पर्याय तरुणांकडे होते. मात्र आता वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक संधी असून इंटरनेटमुळे तरुणांना त्याबाबत माहिती मिळत असल्याचे लेफ्टनंट जनरल कुमार यांनी नमूद केले.