नियम एके नियम कॅशियर झाला नरम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियम एके नियम
कॅशियर झाला नरम!
नियम एके नियम कॅशियर झाला नरम!

नियम एके नियम कॅशियर झाला नरम!

sakal_logo
By

‘‘पासबुक भरून हवं होतं.’’ दामूअण्णांनी बॅंकेतील कर्मचाऱ्याला म्हटलं.
‘‘प्रिंटर खराब झाला आहे. चार दिवसांनी चक्कर मारा.’’ कर्मचाऱ्याने वर न पाहताच उत्तर दिलं.
‘‘मागच्या आठवड्यातही तुम्ही हेच उत्तर दिलं होतं.’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘आम्ही अजिबात शब्द फिरवत नाही, असा त्याचा अर्थ होतो.’’ कर्मचाऱ्याने फुशारकीने म्हटले.
‘‘प्रिंटर दुरुस्त करायला एवढे दिवस लागतात का?’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘प्रिंटर दुरुस्तीसाठी वरच्या कार्यालयात कागदी घोडे नाचवावे लागतात. त्यावेळी कोठे महिनाभरात यश मिळतं.’’ कर्मचाऱ्याने म्हटले.
‘‘बरं मग मी चार दिवसांनी येऊ की महिनाभराने येऊ’’ दामूअण्णांनी विचारले.
‘‘तुम्ही दर चार दिवसांनी महिनाभर येत जा.’’ कर्मचाऱ्याने असं म्हटल्यावर दामूअण्णांनी ती खिडकी सोडली व दुसऱ्या एका खिडकीत जाऊन
‘‘अहो ऽऽऽ’’ एवढं म्हटलं. तेवढ्यात कर्मचाऱ्याने घाईघाईने
‘‘सर्व्हर डाऊन आहे. उद्या या.’’ असे म्हटले. त्यावर मात्र दामूअण्णा चिडले. ‘‘माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. मला एक टाचणी हवी होती.’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘कशाला?’’ कर्मचाऱ्याने त्रासिकपणे विचारले.
‘‘बॅंक कर्मचाऱ्यांच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी लावायची होती.’’ असे म्हणून दामूअण्णा पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. तासभर रांगेत उभे राहिल्यानंतर कॅशियरने ‘लंच ब्रेक’ अशी पाटी लावली.
‘‘अहो, मला पैसे देऊन लंच ब्रेक करा की.’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘हे बघा नियम म्हणजे नियम. एक वाजला की लंचब्रेक होणार म्हणजे होणार. तुम्ही नंतर या.’’ कॅशियरने म्हटले. त्यामुळे नाइलाजाने दामूअण्णा आपल्या दुकानावर आले. बॅंकेतील अपमान त्यांच्या जिव्हारी लागला होता. रविवारी ते आपल्या दुकानात ग्राहकांना किराणा माल देत होते. तेवढ्यात बॅंकेतील कॅशिअर काही खरेदी करण्यासाठी आल्याचे त्यांनी पाहिले. नकळतपणे दामूअण्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
‘‘साहेब, रांगेत या.’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘रांगेत कशाला? आम्ही दोघेच तर आहोत.’’ कॅशियरने म्हटले.
‘‘अहो एकटे असलात तरी रांगेत यावे लागते. आमच्या दुकानाची शिस्त तुम्हाला पाळावी लागेल.’’ दामूअण्णांनी म्हटले. त्यानंतर आधीच्या ग्राहक साबण घेऊन गेल्यावर कॅशियरने एक किलो साखर व एक किलो शेंगदाणे मागितले.
‘‘अहो, आमच्या दुकानातील वजनाचा काटा सकाळीच तुटला आहे. दुरुस्तीसाठी आम्ही काल अर्ज दिला आहे. त्यामुळे चार दिवसांनी चक्कर मारा.’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘असा कसा तुटला वजनाचा काटा? तुम्हाला पर्यायी व्यवस्था ठेवता येत नाही का? आणि वजनकाटा दुरुस्तीसाठी चार दिवस कशाला लागतात. दहा- वीस मिनिटांत काम होत नाही का? ’’ कॅशियरने रागाने म्हटले.
‘‘साहेब, यासाठी वजनमाप विभागाकडे रीतसर अर्ज करावा लागतो. वेळोवेळी फॉलोअप घ्यावा लागतो. त्यानंतर तीन- चार दिवसांनी त्यांचा माणूस येऊन दुरुस्ती करतो. तुमच्या बॅंकेसारखेच कागदी घोडे नाचवावे लागतात.’’ दामूअण्णांनी म्हटले.
‘‘बरं बरं. मला एक ब्रेडचा पुडा आणि गोडेतेलाची एक पिशवी द्या. का त्यासाठी वजनकाटा लागेल?’’ कॅशियरने रागाने विचारले.
‘‘छे छे...या गोष्टी वजन करूनच पॅक केल्या जातात.’’ असे म्हणून त्याने कामगारास ब्रेडचा पुडा व तेलाची पिशवी आणायला सांगितली. कामगाराने ती आणून दिल्यावर दामूअण्णांचे लक्ष घड्याळाकडे गेले. बरोबर एक वाजला होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्या वस्तू कामगाराकडे परत ठेवायला दिल्या.
‘‘सॉरी साहेब! बरोबर एक वाजलाय. आमचे दुकान एक ते चार बंद असते. त्यामुळे तुम्ही आता चार वाजता या.’’ असे म्हणून गालातल्या गालात हसत दामूअण्णांनी दुकान बंद केले.