जिल्हा बॅंकेने विम्याचे मोफत कवच पुन्हा द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंकेने विम्याचे मोफत कवच पुन्हा द्यावे
जिल्हा बॅंकेने विम्याचे मोफत कवच पुन्हा द्यावे

जिल्हा बॅंकेने विम्याचे मोफत कवच पुन्हा द्यावे

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये पगारदार खात्यांसाठी असलेले विम्याचे मोफत कवच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) शिक्षकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांनी जिल्हा बॅंकेकडे केली आहे. राष्ट्रीयकृत बॅंकांच्या धर्तीवर ही विमा योजना कार्यान्वित करावी, अशीही त्यांची मागणी आहे. यामुळे शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबीयांना या विम्याच्या माध्यमातून किमान ३० लाख रुपयांची रक्कम मिळू शकणार आहे.
दरम्यान, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन, या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत येत्या ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. पगारदार खात्यांसाठी ही विमा योजना असते. यानुसार ज्या कर्मचाऱ्यांचे बॅंकेत पगार खाते असते, अशा पगारदार खातेदारांसाठी विम्याचे मोफत कवच बॅंकेकडून दिले जाते. सध्या ही योजना केवळ राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये सुरू आहे. पुणे जिल्हा बॅंकेनेही याआधी दोन वेळा हा प्रयोग केला होता. परंतु दोन्ही वेळा तो फसला. त्यामुळे यापुढे कायमस्वरूपी अशी योजना सुरू केली पाहिजे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. सध्या जिल्ह्यात बॅंकेच्या विविध शाखांमध्ये पगार जमा होणारे साडेअकरा हजार शिक्षक कार्यरत आहेत.
जिल्हा बॅंकेने सन १९९९ मध्ये पहिल्यांदा ही योजना लागू केली होती. परंतु, त्यावेळी ती एका वर्षातच गुंडाळण्यात आली. त्यानंतर सन २०२० मध्ये पुन्हा ही योजना सुरु केली. परंतु त्यावेळीही दोनच वर्षात पुन्हा ती बंद पडली.

असा मिळेल विम्याचा परतावा
१) किमान ३० ते कमाल ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा
२) मृत्यू झाल्यास ३० ते ५० लाखांची रक्कम वारसदारास
३) कायम अपंगत्व आल्यास १५ ते २५ लाख, अंशतः अपंगत्व आल्यास १० ते २० लाख रुपये मिळणार

शिक्षकांनीच दिला होता आधार
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी वेल्हे तालुक्यातील एका शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. या शिक्षकांचे कुटुंब रस्त्यावर आले होते. या कुटुंबाला सावरण्यासाठी शिक्षकांनीच वर्गणीतून पावणे पाच लाख रुपये जमा करत, त्या शिक्षकांच्या कुटुंबाला आधार दिला होता. या बैठकीला सुनील कुंजीर, महादेव माळवदकर, विश्वनाथ कौले, शशिकिरण मांढरे, सुनील लोणकर, संदीप कदम, संभाजी लवांडे हे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा बँक ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची व शेतकऱ्यांशी निगडित छोटे मोठे प्रश्न सोडवणारी बँक आहे. आम्ही शिक्षक देखील शेतकऱ्यांची मुलेच आहोत. त्यामुळे या बँकेने आजपर्यंत आम्हाला कायमच आधार दिला आहे. आमची नाळ या बँकेशी निगडित आहे. राष्ट्रीयकृत बँकेत ग्राहकांना सेवा देखील व्यवस्थित दिली जात नाही. त्यामुळे सर्व शिक्षकांचा विश्वास याच बँकेवर आहे.
- संदीप कदम, अध्यक्ष, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघ

जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे पगार जिल्हा बॅंकेत जमा होत आहेत. परंतु पगारदार खात्यांसाठी असलेले विम्याचे संरक्षण जिल्हा बॅंकेत मिळत नाही. याआधी दोन वेळा शिक्षकांकडून विम्याचा हप्ता घेऊन हे विमा संरक्षण देण्याचा प्रयत्न बॅंकेने केला. परंतु दोन्ही वेळा तो फसला. आता पुन्हा नव्याने ही सुविधा शिक्षकांना राष्ट्रीयकृत बॅंकांच्या धर्तीवर मोफत मिळावी, अशी आमची मागणी आहे.
- विश्‍वनाथ कौले, माजी सभापती, दौंड तालुका शिक्षक पतसंस्था.