वाफगावचा किल्ला संवर्धित करावा ः भूषणसिंहराजे होळकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाफगावचा किल्ला संवर्धित करावा ः भूषणसिंहराजे होळकर
वाफगावचा किल्ला संवर्धित करावा ः भूषणसिंहराजे होळकर

वाफगावचा किल्ला संवर्धित करावा ः भूषणसिंहराजे होळकर

sakal_logo
By

चास, ता. ६ ः किल्ले वाफगाव येथे महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा गजी नृत्य, मर्दानी खेळ, शस्त्र-अस्त्र प्रदर्शन, ढोलवादन व भंडाऱ्याच्या उधळणीने मोठ्या उत्साहात पार पडला. या वर्षी कर्तृत्ववान महिलांना राज्याभिषेकाची संधी देण्यात आली होती. खेडच्या तहसीलदार वैशाली वाघमारे, स्नेहल धायगुडे, उज्ज्वला हाक्के, पूजा मोरे, ललिता पुजारी, संगीता पाटील यांनी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला.
महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजे लढवय्या मनात पेरली. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता, हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे. या पराक्रमी राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तू पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आजही दुर्लक्षित, उपेक्षित आहे. त्याचे जतन, संवर्धन व्हावे, यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्यामुळे परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, पर्यटन वाढेल, अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्याच नेतृत्वात होळकर राजपरिवारातर्फे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते.