पिंपरीतील मराठी संमेलनात 
काव्यातून जीवन चक्राची मांडणी

पिंपरीतील मराठी संमेलनात काव्यातून जीवन चक्राची मांडणी

Published on

पिंपरी, ता. ७ : राज्यभरातून आलेल्या लोकप्रिय कवींच्या हृदयस्पर्शी व वास्तवाला भिडणाऱ्या कवितांची पेशकश, जोडीला नामवंत महिला चित्रकार व शिल्पकारांना हुबेहूब सादर केलेल्या कलेच्या आविष्काराचे सप्तरंग शनिवारच्या रात्री ऐन थंडीत सर्वांना उबदार करून गेले.

निमित्त होते जागतिक मराठी अकादमी व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी आयोजित १८ व्या जागतिक मराठी संमेलनात सादर झालेल्या चित्र-शिल्प-काव्य या कार्यक्रमाचे....! नामवंत कवी फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर तसेच महेश केळुसकर आणि श्रीकांत कदम यांनी सूत्रधार म्हणून वेसण हाती घेतले.

सुरभी गुळवेलकर या मुलीने नायगावकर यांचे समोर बसून काढलेले चित्र, हर्षदा कोळपकर यांनी काढलेले रचनाचित्र, तर राज्यातील पहिल्या महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांनी ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे यांचे समोर बसवून निर्माण केलेले शिल्प या कार्यक्रमाचा परमोच्च आनंद देणारे क्षण ठरले.
कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा येथून आलेल्या २८ कवींनी आपल्या सर्वोच्च रचना या कार्यक्रमात सादर केल्या. विडंबन, हास्य, याचबरोबर हृदयाला व काळजाला भिडणाऱ्या कवितांच्या शिडकाव्या बरोबरच चित्र व शिल्प निर्मितीचा आस्वाद घेण्याची संधी रसिक प्रेक्षकांना लाभली. कवी प्रशांत मोरे यांच्या रचनेचे काव्य मैफलीला सुरवात झाली. त्यानंतर इंद्रजित घुले यांच्या ''लग्नातलं जेवण'' या कवितेने हास्याचा धुरळा उडवून टाकला. लता अहिवळे यांच्या ''बाप ''नावाची शीर्षक असलेल्या कवितेने प्रेक्षकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या, तर भरत दौंडकर यांनी ''अंदाज येत नाही'' ही कविता सादर करून सद्य:स्थितीतील राजकारणावर जोरदार अष्टोप्रहार केला. नारायण पुरी यांच्या ''जांगडगुत्ता'' कवितेने तर वन्समोअरचा गजर उठविला. प्रशांत होळकर, तुकाराम हंडोरे, नितीन देशमुख, मीनाही पाटील, शशिकांत तिरटकर, साहेबराव खांडगे, अरुण म्हात्रे यांच्या कवितांनाही रसिक प्रेक्षकांनी दाद दिली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू एन.जे.पवार, या जागतिक संमेलनाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर मुळे, अशोक नायगावकर, फ.मु. शिंदे यांनीही शेवटी आपल्या कविता सादर करून या काव्यमैफिलीला परमोच्च शिखरावर नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com