
ऑनलाइन वीजबिल भरण्यात आघाडी
पुणे, ता. ८ : वीजबिल ‘ऑनलाइन’ भरणा करण्यामध्ये पुणे परिमंडलाने राज्यातील आघाडी कायम ठेवली आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ५५ लाख ९४ हजार ४६७ घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर लघुदाब वीजग्राहकांनी १ हजार ३७५ कोटी १८ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. तर या आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबरपर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील १ कोटी ६० लाख ४५ हजार ६३२ लघुदाब वीजग्राहकांनी ४ हजार ११२ कोटी ७१ लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला.
बिल भरणासाठी आरटीजीएस सेवा
उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे व ते अनिवार्यही आहे. तर लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे.
लघुदाब वीजबिल ऑनलाइन भरणा (पुणे परिमंडल)
वर्ष - ग्राहक संख्या (दरमहा सरासरी)
- एप्रिल ते सप्टेंबर २०२२ - १७ लाख ४१ हजार ८६०
- ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ - १८ लाख ६४ हजार ८२२
बिल भरणात बंडगार्डन पुढे
गेल्या तिमाहीत पुणे शहरातील ३१ लाख ५६ हजार ६९ लघुदाब वीजग्राहकांनी ७४० कोटी ४० लाख रुपयांच्या वीजबिलांचा ‘ऑनलाइन’ भरणा केला. यामध्ये महावितरणच्या बंडगार्डन विभागातील सर्वाधिक ५ लाख २८ हजार २४८ ग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित शिवाजीनगर, कोथरूड, नगररोड, पद्मावती, पर्वती व रास्तापेठ विभागांमध्ये दरमहा सरासरी ४ लाख ३८ हजार वीजग्राहकांनी ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास पसंती दिली.
पिंपरी-चिंचवडची आघाडी
‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात पिंपरी चिंचवड शहर आघाडीवर आहे. गेल्या तीन महिन्यांत पिंपरी विभागातील ८ लाख ६५ हजार ९५३ तर भोसरी विभागातील ६ लाख ११ हजार ८७७ ग्राहकांनी ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. पुणे ग्रामीणमध्ये गेल्या तिमाहीत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील ९ लाख ६० हजार ५६८ ग्राहकांनी २५९ कोटी १३ लाख रुपयांचा भरणा केला.
बिल भरणासाठी संकेतस्थळ
ऑनलाइन वीजबिल भरणासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in हे संकेतस्थळ व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. तसेच मासिक बिलांचा तपशील व रक्कमेची पावती जतन करण्याची सोय उपलब्ध आहे.