पुण्यात फिरतोय कोयता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात फिरतोय कोयता!
पुण्यात फिरतोय कोयता!

पुण्यात फिरतोय कोयता!

sakal_logo
By

पुणे, ता. १० : ‘कोयता गॅंग’चा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजल्यानंतर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु गर्दीच्या ठिकाणी कोयते घेऊन नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करीत दहशत माजविण्याच्या घटना अद्याप सुरूच आहेत. गेल्या दोन दिवसांत कोंढव्यात तीन तर, रविवार पेठेतील मोबाईल मार्केटमध्ये कोयते, दांडके फिरवत दहशत माजविण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
शहरात काही दिवसांपासून कोयता गॅंगकडून दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसरसह शहरातील वाढत्या गुन्हेगारीसह कोयता गॅंगबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर पोलिसांनी वारजे भागात कोयते घेऊन दहशत पसरविणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांवर ‘मोका’तंर्गत कारवाई केली. परंतु त्यानंतर शहरात पुन्हा ‘कोयता सत्र’ सुरूच आहे. हडपसर, कोंढवा, सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, समर्थ, फरासखाना, डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन गुन्हेगारांकडून हातात कोयते, तलवारी घेऊन वाहनांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रकार घडले आहेत. ‘स्ट्रीट क्राइम’मध्ये गुन्हेगारांकडून अल्पवयीन मुलांचा वापर करून घेतला जात आहे. अशा घटनांमध्ये नागरिक जखमी होण्यासोबत मालमत्तेचेही नुकसान होत आहे. या ‘भाईगिरी’ करणाऱ्या गुन्हेगारांना रोखणे आणि अल्पवयीन मुलांचे समुपदेशन करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

गेल्या महिनाभरातील घटना
१. हडपसर - कोयता गॅंगकडून भाजी विक्रेते आणि दुकानदारांना धमकावून खंडणी मागितल्याच्या घटना.
२. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिंहगड लॉ कॉलेजजवळ दोघांनी कोयते उगारून दुकानात तोडफोड. या हल्ल्यात एक तरुण जखमी.
३. नाना पेठेत नवा वाडा परिसरात जुन्या वादातून कोयते हातात घेऊन पाच जणांनी दहशत माजवली.
४. कॅम्पमधील एका हॉटेलमध्ये कोयते हातात घेतलेल्या तरुणांनी तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिली.
५. वारजे माळवाडीत कोयते हातात घेऊन धमकी देत सराईत गुन्हेगारांकडून धुमाकूळ.
६. तापकीर गल्लीमधील मोबाईल मार्केटमध्ये कोयते, दांडके हातात घेतलेल्या गुंडांकडून तोडफोड.
७. जनता वसाहतीमध्ये पहाटे लोखंडी हत्यार आणि दांडके घेतलेल्या तरुणांनी पाच रिक्षांसह कारच्या काचा फोडल्या.
८. कोंढवा गोकुळनगर येथे पाच जणांच्या टोळक्याने कोयते हवेत फिरवत दांडक्याने वार करून चारचाकी आणि रिक्षाचे नुकसान.
९. शिवनेरीनगरमध्ये कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तरुण जखमी.
१०. टिळकेरनगरमध्ये पानटपरीचालकावर तलवारीने वार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न.

ही आहेत कलमे...
कोयते, लाकडी दांडके हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत माजवणे- भादंवि कलम ४२७, १४३, १४७, १४८, १४९

खुलेपणे शस्त्रविक्री
गुन्हे शाखेच्या पथकाने शहराच्या मध्य भागातील बोहरी आळीमध्ये दुकानातून १०५ कोयते नुकतेच जप्त केले. मध्यप्रदेश, परराज्यातून शस्त्रे आणून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. खुलेपणे शस्त्रविक्री होत असताना पोलिस काय करीत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.


‘कोयता गॅंग’चा धुमाकूळ वाढला आहे. पुण्यासारख्या शहरात असे प्रकार वाढणे चिंताजनक आहे. याबाबत सोबतचा क्यूआर कोड स्केन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपल्या सूचना कळवा.