अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

रिजनल ख्रिश्चन सोसायटीचा शुक्रवारी मोर्चा
पुणे ः छत्तीसगडमधील नारायणपूर येथे समाजकंटकांकडून चर्चवर झालेला हल्ला आणि राज्यातील विविध भागांत ख्रिस्ती समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ रिजनल ख्रिश्चन सोसायटीतर्फे शुक्रवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता शहरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. क्वार्टर गेटजवळील सिटी चर्चपासून मोर्चाला सुरुवात होईल. जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरू रस्ता, पॉवर हाऊस चौक, केईएम हॉस्पिटल चौक, जुनी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय, असा मोर्चाचा मार्ग असेल. सुरुवातीला सिटी चर्च येथे सभा होणार असून, त्यात विविध धर्मांचे लोक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत केदारी, सचिव ॲड. अ. सा. कदम यांनी दिली.

‘तिरळ्या आणि मी’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : वैद्यकीय क्षेत्रात सध्या माणसाचे आयुष्य लांबी वाढविण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर माणसाच्या आयुष्याचा दर्जा वाढविण्याचे काम करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस माणसाच्या बोथट होणाऱ्या भावना आणि कलात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. पुरंदरे प्रकाशनतर्फे ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी लिखित ‘तिरळ्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रसंगी अभिनेते गिरीश कुलकर्णी, प्रकाशक अमृत पुरंदरे, लेखक डॉ. शेखर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

आपुलकीचे बोरन्हाण कार्यक्रम
पुणे : मैत्रयुवा फाउंडेशन व सहेली संघ संस्थेतर्फे बुधवार पेठेतील सार्वजनिक काका सभागृहात आपुलकीचे बोरन्हाण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वेश्यावस्तीत काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी कार्यरत सहेली संस्थेतील मुलांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळी सेवासदन सोसायटीचे सरचिटणीस चिंतामणी पटवर्धन, अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव, पुणे सार्वजनिक सभेचे विश्वस्त सुरेश कालेकर, बालसदन संस्थेच्या अश्विनी नायर, सहेली संघ संस्थेच्या अध्यक्षा महादेवी मादर, तेजस्वी सेवेकरी, मैत्रयुवा फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.

सुभाष एज्युकेशन सोसायटीतर्फे
विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान
पुणे ः सुभाष एज्युकेशन सोसायटीच्या सुभाष प्राथमिक शाळेच्या संस्थापिका मालती बर्वे आणि मुख्याध्यापिका शोभा ऊर्फ सुनीला बर्वे यांच्या स्मरणार्थ या वर्षीपासून क्रीडा आणि शालेय शिक्षण क्षेत्रात लक्षवेधक कामगिरी करणाऱ्या दोन उदयोन्मुख विद्यार्थिनींना उत्तेजन देण्यासाठी ‘मालती शोभा शिष्यवृत्ती’ ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजीव बर्वे, विश्वस्त दिलीप बर्वे, सचिव मधुर बर्वे आणि मुख्याध्यापिका कल्याणी माने उपस्थित होत्या. ऋतुजा धायगावे या विद्यार्थिनीला शालेय शिक्षण वर्गवारीतून, तर यशश्री सपकाळ या विद्यार्थिनीला क्रीडा वर्गवारीतून शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. प्रत्येकी रुपये २० हजार रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे.

मंदिरात ध्वज उभारणीचा उपक्रम
पुणे : मंदिर ही समाजाची अस्मिता आहे. हे आपल्यापेक्षा जास्त आपल्यावर आक्रमण करणाऱ्यांना समजले. त्यामुळे त्यांनी हिंदू समाजाची श्रद्धास्थाने, अस्मिता असणारी मंदिरे धुळीला कशी मिळतील, याचा विचार केला. सामर्थ्य संपन्न आणि सशक्त समाजासाठी मंदिरे टिकली पाहिजेत. मंदिरे समाजाची शक्तिस्थाने झाली पाहिजेत, असे मत विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर यांनी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद मठ मंदिर संपर्क समिती, पश्चिम महाराष्ट्रच्या वतीने ‘मंदिर तेथे ध्वज’ या अभियानांतर्गत पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील प्रमुख मंदिरात प्रत्येकी एक या प्रमाणे पंधरा हजार ध्वज उभारले जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात भवानी पेठेतील भवानी माता मंदिरात डॉ. मनिषा शेटे यांच्या हस्ते ध्वजपूजनाने झाली. या वेळी संजय मुरदाळे, मनोहर ओक उपस्थित होते.