
अजूनही फ्लेक्स लाटकलेलेच!
पुणे, ता. १० ः शहराचे विद्रूपीकरण करणारे बेकायदा फ्लेक्स कर्वे रस्ता, पुणे सातारा रस्ता, मध्यवर्ती भागातील पेठांसह काही महत्त्वाचे चौक, रस्त्यांवरून अजूनही हटविण्यात आलेले नाहीत. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काही ठिकाणी फ्लेक्स काढण्यात येत आहेत. मात्र, काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवण्याची चिन्हे असल्याने कर्मचाऱ्यांकडून संबंधित ठिकाणी कारवाई करण्याचे टाळले जात आहे.
आगामी आठवड्यात शहरामध्ये जी २० परिषद होत आहे. त्यानिमित्त शहरातील काही भागांचे सुशोभीकरण करून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्याचे काम केले जात आहे. एकीकडे शहराचे सौंदर्य टिकावे यासाठी महापालिका प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून रात्रंदिवस काम केले जात असताना शहराच्या वेगवेगळ्या भागात अजूनही बेकायदा फ्लेक्स लटकलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
काय आहे स्थिती?
- शहरातील मध्यवर्ती पेठा, कर्वे रस्ता, पुणे सातारा रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट यासह वेगवेगळ्या भागात फ्लेक्स
- वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम, विविध प्रकारचे सण, समारंभ, खासगी क्लासचे फ्लेक्स तसेच विविध प्रकारच्या जाहिरातींचा समावेश
- फ्लेक्स रस्त्यावरील विजेचे खांब, झाडे, सिग्नल यंत्रणा, दुभाजक अशा ठिकाणी लावण्यात आलेले आहेत
- महापालिकेने संबंधित फ्लेक्सवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही फ्लेक्स उतरविण्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही
कर्मचाऱ्यांपुढे अडचणी...
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मंगळवारी घोरपडी पेठ, रास्ता पेठ, स्वारगेट, शंकरशेठ रस्ता, जुना मोटार स्टॅंड, भवानी पेठ, नाना पेठ अशा विविध ठिकाणी असलेले बेकायदा फ्लेक्स काढण्याचे काम केले जात होते. काही खेळ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवसाचे फ्लेक्स काढताना कर्मचाऱ्यांना अडचणीचे जात होते. फ्लेक्स काढताना तो फाटल्यास अनुचित घटना घडून त्याचे खापर आपल्या डोक्यावर फुटेल, या भीतीने कर्मचाऱ्यांकडून फ्लेक्स लावणाऱ्या संबंधित व्यक्ती, संस्थांना त्यांचे फ्लेक्स काढण्याचे सांगण्यात येत होते. मात्र, संबंधित व्यक्ती, संस्था कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत, असे सांगण्यात आले.
पुणे शहरातील अनेक समस्यांवर बोलताना आपण लगेच प्रशासनाला जबाबदार धरून मोकळे होतो. पण नागरिक, राजकारणी, पदाधिकारी म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे की नाही. फ्लेक्समुळे शहराचे जे विद्रूपीकरण झाले आहे त्याला नेमके जबाबदार कोण? याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. याबाबत आपल्या सूचना सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करून किंवा editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.