कारागृह उत्पादित वस्तू ‘ई-मार्केटप्लेस’वर ः गुप्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृह उत्पादित वस्तू 
‘ई-मार्केटप्लेस’वर ः गुप्ता
कारागृह उत्पादित वस्तू ‘ई-मार्केटप्लेस’वर ः गुप्ता

कारागृह उत्पादित वस्तू ‘ई-मार्केटप्लेस’वर ः गुप्ता

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : कारागृहातील उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेसवर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.
मकर संक्रांती सणानिमित्त उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्‍घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक गुप्ता यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन व विक्री २६ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी या वेळी उपस्थित होते.
विविध सरकारी विभागांकडून कारागृहातील उत्पादित टेबल, खुर्ची, कपाटे, गणवेश, सतरंजी, साड्या, फाईल्स आदी वस्तूंना मोठी मागणी असते. महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध जिल्ह्यांमध्ये कारागृह उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावे आयोजित करण्यात येत असतात. कारागृह उत्पादित वस्तूंची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

बंदीजनांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कायद्यानुसार बंद्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
- अमिताभ गुप्ता, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा)