गायींचे डिजिटल मॉनिटरिंग आयुष्यमान काऊफिटमुळे शक्य; पुण्यातील अरीट स्टार्टअपचे संशोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायींचे डिजिटल मॉनिटरिंग
आयुष्यमान काऊफिटमुळे शक्य; पुण्यातील अरीट स्टार्टअपचे संशोधन
गायींचे डिजिटल मॉनिटरिंग आयुष्यमान काऊफिटमुळे शक्य; पुण्यातील अरीट स्टार्टअपचे संशोधन

गायींचे डिजिटल मॉनिटरिंग आयुष्यमान काऊफिटमुळे शक्य; पुण्यातील अरीट स्टार्टअपचे संशोधन

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : गायींचे आजारपण. त्याच्या उपचारांसाठी होणारा खर्च आणि कधी-कधी त्या आजारपणात गायी दगावण्याची शक्यता. या बाबी शेतकऱ्यांसाठी मोठ्या खर्चिक ठरू शकतात. त्यामुळेच जर गायीच्या आजाराचे लवकर निदान झाले किंवा तिच्यासाठी कोणत्या बाबी आवश्‍यक आहेत हे वेळेत समजले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते.

देशात गायींची संख्या सुमारे ३० कोटींच्या घरात आहे. ज्यांना विविध आजार, माजावरील अडचणी तसेच दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तसेच गायींना वेळोवेळी योग्य उपचार पद्धती न वापरल्याने पुढे दुधाची गुणवत्ताही ढासळते. या सर्व समस्यांवर त्वरित माहिती उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ‘अरीट बिझनेस सोल्यूशन्स’ (Areete) या स्टार्टअपचे उपकरण महत्त्वाचे ठरत आहे. या स्टार्टअपने ‘कॅटल हेल्थ मॉनिटरिंग आयओटी उपकरण’ (आयुष्यमान काऊफिट) तयार केले आहे. जे गायींचे डिजिटल हेल्थकार्ड शेतकऱ्यांना अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देते. हे उपकरण संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. त्याचे अ‍ॅप सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.

पुण्यातील संशोधक श्रीनिवास सुब्रमण्यण, व्ही. एस. श्रीधर आणि श्रीराम सुब्रमण्यण यांनी जानेवारी २०२१ मध्ये या स्टार्टअपची सुरुवात केली आहे. श्रीनिवास सुब्रमण्यण यांनी बजाज, आदित्य बिर्ला यांसारख्या मोठ्या कंपन्यांत तसेच विदेशात थायलंड, इंडोनेशिया, इजिप्त येथे साधारण ३२ वर्षे नोकरी केली आहे. श्रीधर हे गेल्या ३८ वर्षांपासून टाटा कम्युनिकेशमध्ये आयओटी क्षेत्रात कार्यरत आहेत. तर श्रीराम सुब्रमण्यण यांनी अनेक नामांकित कंपन्यांत एचआर व आर्थिक क्षेत्रांत काम केले आहे. हे उपकरण तयार करण्यासाठी त्यांना सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी), रोपार यांनी मार्गदर्शन केले.

कसे काम करते आयुष्यमान काऊफिट
स्टार्टअपने तयार केलेले आयुष्यमान काऊफिट ब्लूटूथ लो एनर्जी टेक्नॉलॉजीशी जोडले आहे. इलेक्ट्रॉनिक चीप आणि सेन्सर असलेले हे उपकरण गायीच्या गळ्यात पट्ट्याद्वारे बांधता येते. तर दुसरे उपकरण (गेटवे) हे गोठ्यात लावण्यात येते. त्यात सिमकार्ड असते. सेन्सरने पाठवलेल्या निरीक्षणांची नोंदणी ठेवून त्याचे विश्लेषण केले जाते. एका गेटवेद्वारे १०० गायींच्या एकावेळी १०० मीटर अंतरापर्यंतच्या सर्व हालचाली हे उपकरण नोंदवू शकते.

शेतकऱ्यांना काय मिळते माहिती?
- गायींची खाण्याची व रवंथ करण्याची पद्धत
- उठण्या-बसण्याची पद्धत
- तापमान
- माजाचे अलर्ट
- सर्व हालचालींचे अलर्ट

उपकरणाची कार्यक्षमता तपासण्यासाठी आम्ही १०० हून अधिक गायींवर तपासणी केली. लम्पीसारख्या रोगामुळे शेतकऱ्यांचे पशुधन हिरावले जात होते. त्यामुळे गायींचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. या मुक्या जनावरांच्या स्वास्थ्यासाठी डिजिटल कॅटल हेल्थ मोहीम राबवली जाऊ शकते. विदेशाच्या तुलनेत कमी किमतीत स्वदेशी डिव्हाईस तयार केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होर्इल. शिवाय गायींचे स्वास्थ्य चांगले राहिल्यास दूध जास्त मिळेल आणि उत्पन्नही वाढेल.
- श्रीनिवास सुब्रमण्यण, संस्थापक, अरीट बिझनेस सोल्यूशन्स