‘नाशिक’साठी विमान नाही, अन् बँकॉकला प्रवासी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नाशिक’साठी विमान नाही, अन् बँकॉकला प्रवासी
‘नाशिक’साठी विमान नाही, अन् बँकॉकला प्रवासी

‘नाशिक’साठी विमान नाही, अन् बँकॉकला प्रवासी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ‘उडान’ योजनेतील पुणे-नाशिक विमानसेवेला विमान मिळत नसल्याने ती पुन्हा सुरु होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे पुणे- बँकॉक सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने आठवड्यातून चार दिवसांची ही सेवा आता केवळ एकच दिवस सुरू आहे. बँकॉकच्या विमानासाठी हीच परिस्थिती राहिली तर ती सेवादेखील बंद होऊ शकते.
पुण्याहून बँकॉकसाठी डिसेंबर २०२२ महिन्यात सेवा सुरू झाली. आठवड्यातून चार दिवस ही सेवा सुरू होती. पहिल्या आठवड्यात विमानांना चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर मात्र प्रवाशांची संख्या घटू लागली. एका वेळी केवळ वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करू लागले. त्यामुळे विमान कंपनी विमान रद्द करण्यावर भर देत आहे. आठवड्यातून तीन वेळा विमान रद्द होत आहे, तर साठ ते सत्तर प्रवाशांचे बुकिंग झाल्यावरच बँकॉकसाठी उड्डाण होत आहे. विमान सेवा सुरू राहण्याच्या तुलनेत विमान रद्द होण्याचे प्रमाण जास्त आहे. पुण्यातून सध्या बँकॉक, सिंगापूर व दुबईसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू आहे. केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते बँकॉक सेवेचे उद्‍घाटन झाले होते.

‘उडान’ला हवे जीवनदान
‘उडान’ योजनेत समाविष्ट असलेल्या विमानसेवेला सरकार अनुदान देते. त्यामुळे तिकिटाचे दर कमी होऊन सामान्यांनादेखील प्रवास करता येतो. पुणे-नाशिक ही सेवा ‘उडान’ योजनेत समाविष्ट होती. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद असताना केवळ दोन वर्षे पूर्ण झाल्याने सरकारने अनुदान बंद केले. त्याच वेळी ही सेवा बंद केली. आता ती सुरू करण्यासाठी विमान नसल्याचे कारण सांगितले जात आहे. उडानविषयी सरकारने आस्था दाखवत पुन्हा ही सेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दाखविणे गरजेचे आहे.

पुणे-नाशिक विमानसेवेसाठी विमान उपलब्ध नाही. आधीच्या विमानात काही तरी तांत्रिक दोष निर्माण झाला होता. आता विमान नसल्याने सेवा सुरू होत नाही. जेव्हा विमान उपलब्ध होईल तेव्हा पुन्हा ती सुरू होईल.
- संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

पुणे-नाशिक विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. सरकारला जर अनुदान द्यायचे नसेल तर हरकत नाही. प्रवासी पूर्ण तिकिटाची रक्कम देऊन प्रवास करतील. मात्र ही सेवा सुरू झाली पाहिजे.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ