सप्ताह शासनाचा; खर्च एजंटांचा !

सप्ताह शासनाचा; खर्च एजंटांचा !

Published on

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १४ ः रस्ते अपघातात दरवर्षी मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घटावे, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागरूकता व्हावी, यासाठी राज्यात ११ ते १७ जानेवारी दरम्यान ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा करण्यात येतो. मात्र, त्यासाठी अवघी एक लाख रुपयांची शासकीय तरतूद आरटीओ कार्यालयांना मिळाली आहे. त्यामुळे ‘आरटीओ’ कार्यालयाने एजंट, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शोरूम चालकांना हाताशी धरले असून त्यातून सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

पुणे शहरात वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. नवले पूल असो की राज्य वा राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात असो. सुरक्षित वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहात वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा, महाविद्यालयांत व्याख्याने आयोजित करणे, नागरिकांसाठी कार्यक्रम घेणे आदींसाठी किमान तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. परंतु, आरटीओला एक लाख रुपयात विविध उपक्रम साजरा करण्याचे आदेश परिवहन खात्याने दिले आहेत. त्यामुळे सप्ताह साजरा करण्यासाठी ‘आरटीओ’ने शक्कल लढवीत सोपस्कार पूर्ण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी एजंट, मोटार ड्रायव्हिंग स्कूल आणि शो-रूम चालकांवर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. त्यामुळे त्यांची ‘आरटीओ’मधील वर्दळ वाढली असून त्यांच्याबरोबर अधिकाऱ्यांच्या बैठकाही वाढल्या आहेत.


रस्ता सुरक्षा सप्ताहात यांचा सहभाग
राज्याच्या गृहखात्याने रस्ता सुरक्षा अभियानात आरटीओ, वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, राज्य परिवहन महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आदी विभागांना रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.

लाखात आरटीओ हे करणार
- महत्त्वाच्या ठिकाणी (चौकात) सभा घेणे
- जनजागृतीपर बॅनर्स लावणे
- माहितीपत्रके, हॅन्डबिलचे वाटप
- वाहनचालकांसाठी प्रबोधनपर कार्यशाळा घेणे
- महामार्गावरील वाहनांना रिफ्लेक्टर लावणे
- विशेष मोहीम घेऊन नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
- वाहन परवान्याविषयी जनजागृती करणे

४४,१९,६६९
- पुण्यातील वाहन संख्या

३२,७४,६७२
- दुचाकी

७,७२,१२५
- चारचाकी

३७,९६०
- कॅब

९१,४५४
- रिक्षा

३,४०८
- स्कूल बस

१,६२५
- रुग्णवाहिका

पुणे क्षेत्रांतील अपघातांची संख्या :

वर्ष एकूण अपघात मृत्यू गंभीर जखमी किरकोळ जखमी
२०२० १९७३ १०२७ ७५१ ८३
२०२१ २१४८ १०३८ ७५८ १३९
२०२२ १९५१ ९२२ ६५५ १३६


राज्यांतील प्रत्येक आरटीओ कार्यालयाला रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी प्रत्येकी एक लाख रुपये दिले आहे. जर त्यापेक्षा अधिक खर्च झाला, तर संबंधित कार्यालयाने त्याचा तपशील दिल्यावर त्यांनी ती रक्कम दिली जाईल.
- विवेक भिमनवार,
परिवहन आयुक्त, मुंबई

रस्ता सुरक्षा सप्ताहासाठी एक लाखांची शासकीय तरतूद आरटीओ कार्यालयांना मिळाली आहे. त्यामुळे एजंट, मोटार ड्रायव्हिंग स्कूल, शोरूम चालकांच्या माध्यमातून हा सप्ताह साजरा करणार आहे. याबाबत आपले मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com