महावितरणच्या योजनेचा ४३ हजार ग्राहकांकडून लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या योजनेचा ४३ हजार ग्राहकांकडून लाभ
महावितरणच्या योजनेचा ४३ हजार ग्राहकांकडून लाभ

महावितरणच्या योजनेचा ४३ हजार ग्राहकांकडून लाभ

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : आर्थिक अडचणीमुळे वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांना बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याच्या महावितरणच्या योजनेचा राज्यातील घरगुती व औद्योगिक अशा एकूण ४३,३४५ ग्राहकांनी लाभ घेतला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. त्यामध्ये पुणे विभागातील ३ हजार ६८६ ग्राहकांचा समावेश आहे.

कोरोनाच्या काळात लॉकडाउनमुळे अनेक वीजग्राहकांना वेळेत बिले भरता आली नव्हती. त्यांच्या बिलाची थकबाकी होती. बिलाच्या मूळ रकमेवर व्याज जमा झाले होते. याशिवाय दंडात्मक रक्कमही भरणे गरजेचे होते. यामुळे थकीत रक्कम अधिक वाढली होती. थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडले गेले होते. अशा ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा सुरू व्हावा, म्हणून महावितरणने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ लागू केली होती. त्यानुसार संबंधित ग्राहकांनी बिलाची मूळ रक्कम भरली तर त्यांना बिलाच्या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपली. या योजनेमध्ये प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी या योजनेत वीजबिलांची मूळ रक्कम भरून पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.

योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यभरातील एकूण ३० हजार ५७१ घरगुती ग्राहकांपैकी सर्वाधिक १४ हजार ५०५ ग्राहक कोकण विभागातील आहेत. त्यांच्या खालोखाल औरंगाबाद विभागातील ७ हजार ९६० ग्राहक आहेत. पुणे विभागातील ३ हजार ६८६ तर नागपूर विभागातील ४ हजार ४२० ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

बंद पडलेली वीज कनेक्शन पुन्हा सुरू करून घेण्यासाठी ग्राहकांनी सवलत योजनेचा लाभ घेतला व त्यांच्याकडून एकूण ९५ कोटी ७१ लाख रुपये महावितरणला मिळाले. यामध्ये कोकण विभागाचा ४१ कोटींचा वाटा आहे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.