श्री एम : आध्यात्मिक गुरू, जागतिक वक्ते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्री एम : आध्यात्मिक गुरू, जागतिक वक्ते
श्री एम : आध्यात्मिक गुरू, जागतिक वक्ते

श्री एम : आध्यात्मिक गुरू, जागतिक वक्ते

sakal_logo
By

श्री एम यांच्या सत्संग फाउंडेशनची शिकवण, ‘गाभ्यापर्यंत जा, सिद्धांत काहीही उपयोगाचे नाहीत. धार्मिक, वांशिक, भौगोलिक, सांस्कृतिक व वैचारिक भेदांच्यापलीकडे जाऊन मानवता ही सर्वत्र एकच आहे, अशी आहे. आध्यात्मिक गुरू, प्रभावी वक्ते व कसदार लेखक असलेल्या श्री एम यांची थोडक्यात ओळख...

श्री एम यांचा जन्म सहा नोव्हेंबर १९४९ रोजी केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये जन्म झाला. त्यांचा तरुणापासून योगी होण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे शिस्त व समर्पणाची कहाणी आहे. वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी हिमालयातील बर्फाच्छादित शिखरांकडे ओढल्या गेलेल्या श्री एम यांनी खऱ्या सद्‌गुरूच्या शोधासाठी प्रवास सुरू केला. या वेळी श्री गुरू बाबाजी यांचे ज्येष्ठ शिष्य असलेल्या माहेश्वरनाथ बाबाजी यांनी त्यांना आश्रय दिला व नाथ परंपरेची दीक्षा दिली. त्यानंतर साडेतीन वर्षे श्री एम यांनी माहेश्वरनाथ बाबाजी यांच्यासह हिमालयात मोठ्या प्रमाणावर भटकंती केली.

त्यांनी २० वर्षांपूर्वी ‘द सत्संग फाउंडेशन’ची स्थापना केली. अनुयायी असणाऱ्या सर्व आध्यात्मिक साधकांना भेटण्याचे व्यासपीठ मिळावे, म्हणून या फाउंडेशनची स्थापना केली. शांतता व सौहार्दाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी श्री एम यांनी २०१५-१६ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर ही साडेसात हजार किलोमीटरची ‘वॉक फॉर होप’ पदयात्रा काढली. देशातील ११ राज्यांतून ही १५ महिन्यांची यात्रा सुमारे एक कोटी लोकांपर्यंत पोचली.

समाजकार्य आणि लेखन
सत्संग फाउंडेशनच्या बॅनरखाली श्री एम यांनी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि पर्यावरणाच्या क्षेत्रांत विविध प्रकल्प राबविले. फाउंडेशनकडून आंध्र प्रदेशातील मदनपल्लेत व उत्तर प्रदेशमधील लाथिरामध्ये विनामूल्य शाळा आणि कौशल्यविकास केंद्र चालविले जाते. मदनपल्लेजवळच ‘स्वास्थ्य’ हे रुग्णालयही पूर्णत्वास येत आहे.
मदनपल्लेजवळील चौडेपल्ले या छोट्याशा गावात स्वजाणीव शोधण्यासाठी ‘सेक्रेड ग्रोव्ह’ सुरू करण्यात आले. येथे आयुर्वेदिक उपचार व योगशास्त्रावरील आरोग्य केंद्रही आहे. त्यांचे ‘अप्रेंटिस्ड टू ए हिमालयन मास्टर - ए योगीज् ऑटोबायोग्राफी’ हे आत्मचरित्र २०११ मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर, त्यांच्या आत्मचरित्राचा दुसरा भाग ‘द जर्नी कंटिन्यूज’ २०१७ मध्ये प्रकाशित झाला. आत्मचरित्राबरोबरच त्यांची उपनिषदे, ध्यानावरील अनेक पुस्तके तसेच ‘शून्य’ ही कादंबरीही प्रसिद्ध झाली. त्यांचे ‘ऑन मेडिटेशन-फाइंडिंग इनफिनिट ब्लिस अँड पॉवर विदिन’ हे पुस्तक पेंग्विन इंडियाने प्रकाशित केले. त्यांची दोन पुस्तके २०२० मध्ये प्रकाशित झाली. त्यात लघुकथांचे ‘होमकमिंग ॲँड अदर शॉर्ट स्टोरीज्’ व पतंजली योगसूत्रावर आधारित ‘योगा अल्सो फॉर द गॉडलेस’ या पुस्तकांचा समावेश आहे. नुकतेच यावर्षी लेडी मोहिनी केंट यांच्याबरोबरचे ‘द फ्रेंड : माइंड, बॉडी ॲँड सोल, वेल-बिइंग’ हे पुस्तक प्रकाशित झाले. श्री एम यांच्या पुस्तकांचा अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

जागतिक संस्थांकडून आमंत्रण
श्री एम यांना बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेबरोबर जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे, जागतिक बॅंकेसारख्या जागतिक संस्थांनीही व्याख्यानासाठी आमंत्रित केले. त्यांनी गुगल, याहूसारख्या अमेरिकी कंपन्यांबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसारख्या भारतीय शैक्षणिक संस्थांमध्येही मार्गदर्शन केले आहे. त्यांना जानेवारी २०२० मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. आंध्र प्रदेशमधील मदनपल्लेत ते सहजसाधे जीवन जगतात. संगीताचा आस्वाद घेत ते फावल्या वेळेत चित्रेही काढतात.