‘ती’ आता कुटुंबात सुखरुप पोहचलीये ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ती’ आता कुटुंबात सुखरुप पोहचलीये !
‘ती’ आता कुटुंबात सुखरुप पोहचलीये !

‘ती’ आता कुटुंबात सुखरुप पोहचलीये !

sakal_logo
By

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १५ ः अनॉंग (नाव बदललेले आहे) तिचं नाव. थायलंडमधील खेड्यात राहणाऱ्या अनॉंगला तिच्या कुटुंबाला आर्थिक आधार द्यायचा होता. मित्रावर मोठा विश्‍वास ठेवून नोकरीसाठी तिने पुणे गाठले. पण मित्राने तिला नोकरीच्या नावाखाली मसाज सेंटरमध्ये देहविक्रय करण्यास भाग पाडले. तेथून सुटका करून घेण्यासाठी तिची धडपड सुरु होती, पण त्याला यश येत नव्हते. अखेर एक दिवशी पोलिसांनी त्या सेंटरवर छापा टाकून तिच्यासह पाच परदेशी तरुणींची सुटका केली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनॉंग तिच्या गावी निसर्गाच्या सानिध्यात पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेऊ लागली आहे !


युवतींना कसे फसविले जाते?
१) कधी नोकरीचा बहाणा करून, तर कधी प्रेमाच्या नावाखाली लग्नाचे आमिष दाखवून तर केव्हा कुटुंबीयांशी झालेल्या वादाचा गैरफायदा घेत काही व्यक्ती तरुणींना पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरात आणून त्यांना जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करतात.
२) थायलंड, नेपाळ, बांगलादेश अशा भारताच्या शेजारील देशांबरोबरच पश्‍चिम बंगाल किंवा झारखंड, मिझोराम, सिक्कीम, मणिपूर, नागालॅंड, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश अशा काही राज्यांमधील तरुणींची संख्या त्यामध्ये मोठी असते.
३) इथे आल्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणींच्या लक्षात येते. अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना तेथून बाहेर पडण्यास अडचण येते.


कशी कारवाई होते?
पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मागील सहा महिन्यांत शहराच्या वेगवेगळ्या भागात स्पा सेंटर, लॉज, ऑनलाइन माध्यमाद्वारे चालणारे सेक्‍स रॅकेट, वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणी छापे टाकले. अनेकदा स्पा सेंटर चालक, मालक, एजंट, त्यांच्याकडील गुंड आणि आर्थिक परिस्थितीमुळे पीडित तरुणींना बाहेर पडण्यास अडचण येते. पोलिसांच्या कारवाईमुळे तरुणींची सुटका होऊन त्यांना न्यायालयामार्फत रेस्क्‍यू फाउंडेशनमध्ये पाठविले जाते. तेथून त्यांच्या इच्छेनुसार त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्याची व्यवस्था केली जाते.

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई (२०२२)

५७
- सुटका केलेल्या तरुणी

२८
- परराज्यातील तरुणी

१४
- परदेशातील तरुणी


- परदेशात स्वगृही पाठविलेल्या तरुणी


- परदेशात स्वगृही पाठविण्याच्या प्रक्रियेत असलेल्या तरुणी

स्पा सेंटर, लॉज, ऑनलाइन सेक्‍स रॅकेट अशा माध्यमाद्वारे बेकायदेशीर वेश्‍याव्यवसाय होणाऱ्या ठिकाणी कारवाई केली जाते. तेथून पीडित तरुणींची सुटका करून त्यांना न्यायालयामार्फत रेस्क्यू फाउंडेशनकडे पाठविले जाते. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना मायदेशी पाठविण्यासाठी पोलिसांकडून सहकार्य केले जाते.
- विजय कुंभार,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा

मित्रावर विश्‍वास ठेवून मी थायलंडहून नोकरीसाठी पुण्यात आले. प्रत्यक्षात मित्राने नोकरीऐवजी स्पा सेंटरमध्ये जबरदस्तीने वेश्‍याव्यवसाय करण्यास भाग पाडले. पोलिसांच्या कारवाईनंतर स्पा सेंटरमधून माझ्यासह तिघींना तेथून बाहेर पडता आले. आता मी माझ्या घरी सुखरूप पोचली असून पुन्हा एकदा कुटुंबाशी एकरूप झाली आहे.
- अनॉंग (नाव बदलले आहे)