पुणे होत आहे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे होत आहे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ !
पुणे होत आहे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ !

पुणे होत आहे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ !

sakal_logo
By

सर्वांगिण विकास प्रक्रियेला चालना देणाऱ्या ‘जी- २०’ परिषदेचे अध्यक्षस्थान सध्या भारताकडे आहे. या परिषदेत २० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. त्यातील पायाभूत सुविधांची बैठक १६ आणि १७ जानेवारीला पुण्यात होत आहेत. अल्पावधीतच शिक्षण, पर्यावरण विषयांच्या बैठकाही येथे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर देशात वेगाने विकसित होत असलेले पुणे कसे बदलत आहे, याचा मागोवा घेणारी वृत्तमालिका....

सेक्टर ः पायाभूत सुविधा
उमेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १५ : पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर, राज्यातील एक प्रमुख शहर असलेल्या पुण्याने विकासाची कास आता धरली आहे. त्यासाठी शहर आणि परिसरात दोन प्रकारचे रिंग रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-मुंबई दरम्यान हायस्पीड रेल्वे, वाघोलीजवळ बहुमजली उड्डाण पूल आदी बहुविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प साकारत आहेत. त्यांची पूर्तता येत्या पाच वर्षांत होण्याची शक्यता असून ते झाल्यावर पुण्याचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. त्यातून राज्याचेच नव्हे तर, देशातील एक महत्त्वाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून पुण्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.


वेगाने वाढणारे शहर
महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. उत्कृष्ट हवामान, मुबलक पाणी, सुलभ दळणवळण आणि मुबलक कुशल मनुष्यबळ आदींमुळे शहर व परिसराकडे देशातूनच नव्हे तर जगभरातील उद्योजकांचा ओढा वाढत आहे. शहर आणि परिसराची लोकसंख्या ७५ लाखांहून जास्त झाल्यामुळे शहराचा भौगोलिक विस्तारही होत आहे. त्यामुळेच राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असलेले हे शहर ठरले आहे. या शहराच्या विकासाला आणखी गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून गेल्या काही वर्षांत पायाभूत सुविधांचे मेट्रो, आयटी पार्कचे विस्तारीकरण, द्रुतगती मार्गाचे सक्षमीकरण, रेल्वे बहुपदरी मार्ग आदी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी निधीची तरतूद, भूसंपादन, प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. त्यात येत असलेल्या अडथळ्यांवर मातही करण्यात येत आहेत.

पुणे टाकणार अर्थव्यवस्थेत भर
पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम झाल्यावर शहरातील उद्योग, उत्पादन आणि सेवा क्षेत्र आणखी बहरणार असून त्यातून रोजगाराला चालना मिळाल्यावर शहरातील क्रयशक्तीची वाढ होणार आहे. परिणामी, शहरातील नागरिकांचे राहणीमान उंचावतानाच अर्थव्यवस्थेतही पुणे मोलाची भर टाकणार आहे. याचवेळी शहराचे पर्यावरण चांगले राहण्यासाठी नदीकाठ संवर्धन, जायका आदी प्रकल्पांसाठीही प्रक्रिया सुरू झाली आहे. एकंदरीतच या प्रकल्पांतून येत्या चार-पाच वर्षांत जगाला नव्या पुण्याची ओळख होणार आहे.


काही प्रमुख प्रकल्प.....
पुरंदरचे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ ः
- पुरंदर तालुक्यातील सात गावांतील २, ८३२ हेक्‍टर जागा निश्‍चित
- अपेक्षित खर्च १४ हजार कोटी रुपये
- भूसंपादनाचे काम आता एमआयडीसीकडे

‘एसएसआरडीसी’चा रिंगरोड ः
- सहापदरी रस्त्याची १७७ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदी
- एकूण खर्च २२ हजार कोटी, ‘हुडको’कडून ११ हजार कोटी कर्ज मंजूर
- पहिल्या टप्प्यात शहराच्या पश्‍चिम भागातील रिंगरोड होणार


‘पीएमआरडीए’चा रिंगरोड ः
- ८८ किलोमीटर लांबी आणि ६५ मीटर रुंद
- नव्याने डीपीआर तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात
- पहिल्या टप्प्यात मुंबई-पुणे ते नगर रस्त्याचे काम सुरू

- भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग ः
- तीन जिल्ह्यातून जाणारा २२५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग
- १३०० ते १५०० कोटी रुपयांची गरज
- राज्य सरकारकडून मान्यता, परंतु रेल्वे बोर्डाची मंजुरी प्रलंबित
- ग्रीन कॉरिडॉरची याच मार्गावर चाचपणी

मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर ः
- सुमारे ७५० किलोमीटरचा मार्ग
- प्रकल्पाचा अंदाजे १४ हजार कोटी खर्च
- २२० ते ३५० प्रतिकिलोमीटर या वेगाने धावणार
- मुंबई-पुणे अंतर ४५ मिनिटांत, तर पुणे-हैदराबाद साडेतीन तासांत शक्य
- सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार; राज्य सरकारकडून मान्यता नाही

नगर रस्त्यावर उड्डाणपूल ः
- नगर रस्ता, वाघोली दरम्यान वाहतुकीची कोंडी फोडणे
- येरवडा ते शिक्रापूर रस्ता सहापदरी करण्यासंबंधीचा प्रस्ताव
- सुमारे ५६ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल होणार
- प्रकल्प अहवाल तयार
- सुमारे ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित
- केंद्र सरकारकडून निधी देण्यास तत्त्वतः मान्यता


पुणे शहर आणि परिसराची क्षमता मोठी आहे. पुरंदर विमानतळ, रिंगरोड, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे असे अनेक प्रकल्प हे शहर व परिसराच्या विकासाला आणखी गती देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. उशिरा का होईना, यापैकी अनेक प्रकल्पांचे काम सुरू झाले आहे. परंतु या कामाने वेग घेतलेला नाही. हे प्रकल्प वेळेत मार्गी लावले पाहिजे.
- सतीश मगर,
अध्यक्ष, क्रेडाई नॅशनल

जागतिक दर्जाचे शहर म्हणून पुणे शहराची वाटचाल वेगाने सुरू आहे. मात्र सर्व सोयी-सुविधा असून देखील या शहराला २४ तास नागरी वाहतूक विमानतळ नसल्यामुळे काही मर्यादा येत आहेत. पुणे हे पश्‍चिम महाराष्ट्रातील शेती, औषधे आणि औद्यागिकदृष्टया एक हब आहे. त्यासाठी कार्गो सक्षम करण्याची गरज आहे. स्वतंत्र आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्याच्या विकासासाठी गरजेचे आहे.
- धैर्यशील वंडेकर,
हवाई वाहतूक तज्ज्ञ

औद्यागिक, माहिती-तंत्रज्ञान, शैक्षणिक आणि संशोधन या क्षेत्रात देशात वेगाने विकसित होणारे आणि सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होणारे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. चांगल्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा भक्कम झाल्या तर आगामी काळात मेडिकल टुरिझम, परदेशी विद्यापीठे शहरात येण्याचे प्रमाण आणखी वाढेल.
- सुधीर मेहता,
माजी अध्यक्ष, एमसीसीआयए