मुळा-मुठा नदीचे रुपडे पालटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळा-मुठा नदीचे रुपडे पालटणार
मुळा-मुठा नदीचे रुपडे पालटणार

मुळा-मुठा नदीचे रुपडे पालटणार

sakal_logo
By

ब्रिजमोहन पाटील ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १६ ः शहरातून वाहणाऱ्या मुळा- मुठा नदीचा पुणेकरांना अभिमान वाटावा, ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक व्हावी, यासाठी मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प आणि नदी पुनर्जीवन प्रकल्प एकाच वेळेस राबविले जात आहेत. यासाठी ६ हजार १५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यामध्ये मैलापाणी प्रक्रिया करून स्वच्छ पाणी नदीत सोडले जाणार आहे. याशिवाय सुशोभीकरण, नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध होणार असल्याने थेट नदीशी संपर्क येणार आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत केवळ नदीचे नाही तर पूर्ण पुण्याचे रुपडे पालटणार आहे. पुणेकरांना अभिमान वाटावा अन पर्यटकांना आकर्षित करणारे शहर म्हणून पुण्याची ओळख होईल.

शहरीकरणाच्या रेट्यामुळे मुळा-मुठा नदीच्या प्रदूषणात वाढ झाली. त्यामुळे जैवविविधताही धोक्यात आली. शहरातून ४४ किलोमीटर वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीचे रूप बदलून शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी महापालिकेने आता पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
मुळा-मुठा नदीमध्ये रोज ८८३ एमएलडी मैलापाणी येत आहे. त्यापैकी सुमारे ५५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होते. प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा नदीत सोडले जाते. २०४७ पर्यंतचा विचार करून ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नदी सुधार प्रकल्पाचे (जायका) काम सुरू आहे.


नदी सुधार प्रकल्प
११ ठिकाणी
- मैलापाणी शुद्धीकरण केंद्र

११३ किलोमीटर लांबी
- मलवाहिन्या टाकणार

९९०.२६ कोटी रुपये
- प्रकल्पाचा एकूण खर्च (२०१५-१६)

१४५० कोटी रुपये
- सहा वर्ष विलंबाने खर्च

८४१.७२ कोटी रुपये
- जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून कर्ज घेऊन महापालिकेला दिले

६०८ कोटी रुपये
- महापालिकेला होणार खर्च

नदीकाठ सुधार प्रकल्प
११
- एकूण टप्पे

दोन टप्पे
- काम सुरू

३.७ किलोमीटर
- संगमवाडी पूल ते बंडगार्डन पूल

२६५ कोटी रुपये
- खर्च

५.३ किलोमीटर
- बंडगार्डन ते मुंढवा

६०४ कोटी रुपये
- खर्च

नदीकाठ सुधार प्रकल्पाचे नियोजन
- संगमवाडी ते बंडगार्डन पूल या कामाचा खर्च महापालिका करणार
- दोन्ही टप्प्यात नदीपात्रातील माती खोदार्इ, मुरूम खोदार्इ, कठीण दगडामधील खोदार्इ, वाहतूक करणे, ओपन फाउंडेशन, पदपथ निर्मिती, सायकल ट्रॅक तयार करणे, गॅबियन वॉल बांधणे, झाडे लावणे, विद्युत व्यवस्था अशी कामे तीन वर्षांत होणार आहेत.

मुळा-मुठा नदीचे सध्याचे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने नदीकाठ सुधार आणि जायका प्रकल्पाच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. नदीकाठ सुधार प्रकल्पात पर्यावरणाचा विचार करून हा प्रकल्प केला जात आहे. नदीकाठी निर्माण होणारी जागा ही नागरिकांसाठीच वापरली जाणार आहे. त्यामध्ये पादचारी मार्ग, सायकल मार्ग, बसण्यासाठी जागा, बोटिंग यासह इतर सुविधा होतील. ३०० मीटरचा प्राधान्याने केला जाणारा टप्पा पूर्ण झाल्यानंतर याचा नागरिकांना अनुभव येईल. तसेच नदीमध्ये येणारे मैलापाणी शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण कमी होईल. हे दोन्ही प्रकल्प ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण होतील.
- विक्रम कुमार,
आयुक्त, महापालिका

नदीकाठसुधार आणि जायका हे दोन प्रकल्प पुण्यात एकाच वेळेस होत आहेत. त्यामुळे मुळा-मुठा सुंदर आणि स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. पुण्याचा चेहरा-मोहरा बदलून जाईल. नदीकाठसुधार प्रकल्प झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारी जास्तीत जास्त जमीन नागरिकांच्या वापरात आली पाहिजे. त्यावर मनोरंजनासह प्रदर्शन व इतर उपक्रम राबविता आले पाहिजेत. यातून आर्थिक चक्रालाही गती मिळेल. पर्यावरणीय दृष्टिकोनातून विचार केला असता आपल्याकडे पावसामुळे नाही तर धरणातून पाणी सोडल्यानंतरच पूर येतो. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर धरणातील पातळी, नदीला येणारा पूर याचे योग्य नियोजन केल्यास नुकसान होणार नाही.
- अनघा परांजपे-पुरोहित,
नगररचनाकार

नदी सुधार प्रकल्पाची सद्यःस्थिती (जायका)
१) मत्सबीज केंद्र हडपसर, डॉ. नायडू, धानोरी, भैरोबा, वारजे, वडगाव बुद्रूक, बोटॅनिकल गार्डन औंध, मुंढवा येथील एसटीपीचे बेसिक इंजिनिअरिंग पॅकेज (बीइपी) तयार केले आहे.
२) धानोरी येथील एसटीपीचे काम सुरू झाले आहे.
३) अस्तित्वातील नायडू व भैरोबा केंद्र पाडण्याचे काम अंतिम टप्प्यात
४) बाणेर आणि भैरोबा येथील मलवाहिनीचे अंतिम आराखडे निश्‍चीत
५) हा प्रकल्प २०२५ मध्ये पूर्ण होणार


नदीकाठ सुधारची सद्यःस्थिती
१) संगमवाडी ते बंडगार्डन व बंडगार्डन ते मुंढवा या दोन्ही टप्प्यात ३०० मीटरचा पहिल्या टप्प्याचे काम सुरू होणार
२) नदीकाठ विकसित करताना उपलब्ध होणारी जागा नागरी सुविधांसाठी वापरली जाणार
३) गॅबियन भिंतीचे काम पूर्ण झाल्यानंतर पादचारी मार्ग, सायकल मार्ग व इतर सुविधांचे काम
४) नदीपात्रात शोभेची झाडे न लावता फळ, फूल येणारी, प्राण्यांसाठी उपयुक्त, सावली देणारी झाडे लावली जाणार
५) २०२५ पर्यंत दोन्ही टप्पे पूर्ण होणार