भट्टी जमलेला ‘थ्रिलकॉम’ - वाळवी
नवा चित्रपट
वाळवी
................
भट्टी जमलेला ‘थ्रिलकॉम’
बांधीव संहिता, भन्नाट दिग्दर्शन आणि भक्कम तांत्रिक बाजूला कलाकारांनी दिलेली अफलातून साथ, अशी भट्टी जमून आल्यावर प्रेक्षकांना जी मेजवानी मिळते, ती म्हणजे ‘वाळवी’ चित्रपट. परेश मोकाशी या कल्पक आणि प्रयोगशील दिग्दर्शकाने मराठीत यापूर्वी न झालेला प्रयोग करण्याचे धाडस दाखवले आणि ते कमालीचे यशस्वी ठरले आहे. सस्पेन्स थ्रिलर आणि ब्लॅक कॉमेडीचे अचूक मिश्रण असलेला हा ‘थ्रिलकॉम’ या प्रकारातील चित्रपट आहे.
ट्रेलरमध्ये दाखवलेल्या प्रसंगांनीच चित्रपटाची सुरुवात होते. एका खुनाभोवती हे कथानक फिरणार आहे, याची कल्पना आपल्याला प्रारंभीच येते. अनिकेत (स्वप्नील जोशी) आणि देविका (शिवानी सुर्वे) यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. अनिकेतची पत्नी अवनी (अनिता दाते-केळकर) मानसिक आजाराने ग्रस्त आहे. तिला वाटेतून दूर करण्यासाठी अनिकेत आणि देविका तिच्या खुनाची बिनचूक आखणी करत असतात. हा खून आत्महत्या वाटेल, असा बेत ते दोघे आखतात. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी यशस्वीपणे होते का? डॉक्टर अंशुमनचा (सुबोध भावे) याचा यात काय सहभाग आहे? या चार पात्रांचा एकमेकांशी काय संबंध आहे? वाळवीचा नेमका संदर्भ काय? या सगळ्या प्रश्नांची थक्क करणारी उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपटच पाहायला हवा.
अनपेक्षित ट्विस्ट्स हा चित्रपटाचा मूळ गाभा आहे. पुढे काय होणार, हा प्रश्न चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या मनात सतत घोंगावत राहतो. मात्र, त्याचं उत्तर शोधण्यासाठीचा वेळ मिळत नाही, इतक्या वेगाने कथा पुढे सरकत राहते. आणि विचार करण्यास वेळ मिळाला, तरी देखील प्रेक्षकांच्या अंदाजानुसार एकही गोष्ट घडत नाही. अगदी बाबुराव अर्नाळकर, शेरलॉक होम्स, ॲगाथा ख्रिस्ती ते अलीकडच्या सगळ्या वेबसिरीज कोळून प्यायलेला प्रेक्षक समोर असेल, तरी त्याला आश्चर्याचा धक्का देणाऱ्या घटना घडत जातात. इथेच लेखकाने आणि दिग्दर्शकाने निम्मी बाजी मारली आहे.
गोळीबंद संहिता, हे चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. प्रत्येक वाक्यामागे, प्रत्येक तपशीलामागे विशिष्ट अर्थ आहे, ज्याचा संदर्भ चित्रपट संपल्यानंतर लक्षात येतो. पात्रांच्या ‘कॅरेक्टरयाझेशन’बाबत लेखिका मधुगंधा कुलकर्णी (सहलेखक - परेश मोकाशी) यांना स्पष्टता आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्यात विसंगती आढळत नाही. रहस्याला विनोदाची बेमालूम फोडणी आहे; पण एकही विनोद पाचकळ नाही. हा विनोद उपरोधिक आहे. माणसाच्या स्वभावातल्या विसंगतीवर, दोषांवर तो अलगद बोट ठेवतो. एकावर एक धक्के बसत असतानाही प्रेक्षक सतत खदखदून हसत असतात, ही किमया लेखिकेला साधली आहे.
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ यांसारख्या कलाकृतीनंतर दिग्दर्शक परेश मोकाशी आपल्या पोतडीतून काय बाहेर काढणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. ही उत्सुकता संपवताना एक ‘मास्टरपीस’ मोकाशींनी सादर केला आहे. दिग्दर्शक म्हणून चित्रपटाच्या प्रत्येक क्षणावर त्यांची मजबूत पकड आहे. पात्रांची आणि कथेची पार्श्वभूमी मांडण्यासाठी मोकाशी यांनी वेळ घालवला नाही. त्यामुळे चित्रपटाची लांबीही आटोपशीर आहे. संकलनालाही पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत.
प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख निभावली आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांना त्यांची ‘इमेज’ मोडून वेगळ्या शैलीत बघणे, हा सुखद अनुभव आहे. अभिनेता म्हणून आपली रेंज ते सिद्ध करतात. शिवानी सुर्वेची देविका उत्तरार्धात प्रचंड भाव खाऊन जाते. टायमिंगच्या उत्तम सेन्सने तिने या भूमिकेचे सोने केले आहे. अनिता दातेची भूमिका वेगळी, पण लक्षणीय आहे. नम्रता संभेराव छोटेखानी भूमिकेतही लक्षात राहते. चित्रपटाची गरज लक्षात घेऊन एकही गाणे यात नाही, हे महत्त्वाचे. मात्र, पार्श्वसंगीत कथानकाला पूरक आणि उठाव देणारे आहे.
‘वाळवी’ हा फक्त उत्कृष्ट मराठी चित्रपट नव्हे, तर जागतिक दर्जाचा सिनेमा आहे. बौद्धिक मनोरंजन करणारी ही ‘वाळवी’ चुकवू नये, अशीच आहे.
-------
चित्रपट : वाळवी
लेखक : मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी
दिग्दर्शक : परेश मोकाशी
कलाकार : स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते-केळकर, नम्रता संभेराव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.