
बाणेर, पाषाणमध्ये अपघातांत दोघांचा मृत्यू
पुणे, ता. १८ : बाणेर आणि पाषाण परिसरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. या घटना सोमवारी (ता. १६) घडल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात एका पादचारी तरुणाला सिमेंट वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यात पंकज गौड (वय १८, रा. कस्पटे वस्ती, वाकड) या तरुणाचा मृत्यू झाला. गौड हा सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्याने जात होता. अज्ञात डंपरचालकाविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पाषाण परिसरात अन्य एका घटनेत टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार प्रकाश नरबहादूर कारकी (वय ३१, रा. बावधन) याचा मृत्यू झाला. याबाबत त्याची पत्नी बिश्ना कारकी (वय २८) हिने फिर्याद दिली. प्रकाश कारकी हा मूळचा नेपाळचा आहे. तो भाजी खरेदी करण्यासाठी पाषाण रस्त्याने निघाला होता. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार प्रकाश याला धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे प्रकाशचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला आहे.