
‘पीएमपीत प्रवाशांजवळ जाऊन तिकीट द्यावे’
पुणे, ता. १८ ः पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वाहकांनी प्रवाशांच्या जागेवर जाऊन तिकीट घ्यावे, प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देत या नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा पीएमपीचे नूतन मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून पीएमपी बसचे वाहक सीटवर बसून तिकीट वितरित करीत आहेत. त्याचा त्रास प्रवाशांना होत असल्याने तक्रारीत मोठी वाढ झाली. वाहतूक व्यवस्थापकांनी याची गंभीर दखल घेत अशा वाहकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. सुधारणा करण्याच्या सूचना सर्व डेपो प्रमुखांना दिल्या आहेत. वाहकांनी कामकाज करताना प्रवाशांना जागेवर जाऊन तिकीट द्यावे, प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही, याची दक्षता सर्व वाहकांनी घ्यावी. या नियमांचे काटेकोरपणे होत नसेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.