
हिंदी राष्ट्रभाषा असल्याच्या उल्लेखात दुरुस्ती
पुणे, ता. १९ ः हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख करणाऱ्या शासकीय अध्यादेशातील चुकीवर टीकेची झोड उठल्यानंतर राज्य सरकारला अखेर जाग आली आहे. या अध्यादेशातील हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा उल्लेख वगळून सुधारणा करणारे शुद्धीपत्रक सरकारने प्रसिद्ध केले आहे.
राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यासाठी काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे नमूद करण्यात आले होते. ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे हिंदी साहित्याच्या उन्नतीसाठी आणि उत्तेजनासाठी राज्यामध्ये हिंदी साहित्य अकादमीची स्थापना करण्यात आलेली आहे’, असा उल्लेख यात करण्यात आला होता. या उल्लेखाविरोधात सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली होती. विविध भाषा तज्ज्ञांसह राजकीय नेत्यांनी यावर संताप व्यक्त करत दुरुस्तीची मागणी केली होती. या टीकेची दखल घेत सांस्कृतिक विभागाने ‘हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने’ हा शब्दप्रयोग वगळण्याचा सुधारित अध्यादेश काढला आहे. सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात यांची या अध्यादेशावर स्वाक्षरी आहे.