साखर कारखान्यांनी हायड्रोजन निर्मितीवर अधिक भर द्यावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर कारखान्यांनी हायड्रोजन निर्मितीवर अधिक भर द्यावा
साखर कारखान्यांनी हायड्रोजन निर्मितीवर अधिक भर द्यावा

साखर कारखान्यांनी हायड्रोजन निर्मितीवर अधिक भर द्यावा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः सध्याच्या परिस्थितीत साखर उत्पादन जास्त होऊ लागले आहे. यामुळे साखरेला किफायतशीर भाव मिळत नाही. यासाठी राज्यातील साखर कारखान्यांनी आता साखर उत्पादन कमी करून इथेनॉल, मिथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायो गॅस (सी.बी.जी.), नायट्रोजन आणि हायड्रोजन निर्मितीकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शनिवारी (ता. २१) राज्यातील साखर कारखान्यांना केले.
देशाच्या उर्जेच्या गरजेत हायड्रोजन हा महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण हायड्रोजन हे पेट्रोल व डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असून ते स्वच्छ आहे. जे ज्वलनानंतर पाणी तयार करते. त्यामुळे अशा पदार्थांच्या उत्पादनासाठी साखर कारखान्यांनी प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख, महासंचालक संभाजी कडू पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने राष्ट्रीय हायड्रोजन धोरण जाहीर केले आहे. हायड्रोजन हे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असल्याचे सिद्ध झाले आहे आणि हे भविष्यातील पर्यायी इंधन ठरणार आहे. हायड्रोजन हे स्वच्छ इंधन आहे. हायड्रोजनवर आधारित वाहने डिझेल इंजिनापेक्षा तिप्पट परिणाम देतात. साखर उद्योगाकडे भरपूर संसाधने असून कारखान्यांनी त्यांचा वापर हायड्रोजनच्या उत्पादनासाठी केला पाहिजे. यामुळे साखर कारखान्यांना आसवनींतील बायोगॅस आणि वीजनिर्मिती प्रकल्प यापासून हायड्रोजन तयार करता येऊ शकेल. साखर कारखान्यांना भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व सध्याच्या जागतिक स्पर्धेत टिकून रहायचे असेल तर, साखरेव्यतिरिक्त इतर उपपदार्थांवर आधारित उत्पादने तयार करण्याची नितांत गरज आहे. यानुसार कारखान्यांनी साखर, इथेनॉल आणि सीबीजी, हायड्रोजन आदी उपउत्पादन निर्मितीवर अधिक भर दिला पाहिजे.’’
या समारंभात राज्यातील सहकारी व खासगी कारखाने, शेतकरी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री शिंदे
राज्यातील शेतकरी हा अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यास राज्य सरकारचे प्राधान्य राहील. ऊसतोडीसाठी मजूर मिळेनासे झाल्याने राज्यातील ऊसतोडीसाठी हार्वेस्टर ही ऊस तोडणी यंत्रे उपलब्ध करून दिली जातील. यासाठी राज्य सरकार ९०० हार्वेस्टर खरेदीसाठी सहकार्य करेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी बोलताना दिले. राज्य सरकारने साखर कारखान्यांना नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील कारखान्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम सरकार करेल. राज्यातील साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे आणि टिकणे गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने साखर उद्योगासोबत अन्यही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना शेतकऱ्यांसाठी १८ सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहेत. या प्रकल्पांमुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा अधिक जमीन ओलिताखाली येईल. याशिवाय कृषि उत्पादनावर प्रक्रीया करणाऱ्या उद्योगात वस्त्रोद्योगानंतर साखर उद्योगाचा क्रमांक लागतो. यामुळे राज्य सरकार हे कृषी क्षेत्रातील संशोधनाला आणि इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देईल, असे आश्‍वासनही शिंदे यांनी या वेळी दिले.

PNE23T19794