आदिशक्तीच्या जागरासाठी महाराष्ट्र सज्ज

आदिशक्तीच्या जागरासाठी महाराष्ट्र सज्ज

पुणे, ता. १३ ः आदिशक्तीच्या जागराचा, गौरवाचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (ता. १५) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या चैतन्यमयी उत्सवाच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. राज्यभरातील सर्व देवीची मंदिरे आदिमायेच्या स्वागतासाठी सज्ज झाली असून रोषणाईने सजली आहेत. घरोघरी होणाऱ्या घटस्थापनेच्या तयारीसाठी बाजारातही गर्दी झाली आहे.
माहूर येथील रेणुका मातेचे मंदिर, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि वणी येथील सप्तशृंगी मातेचे मंदिर ही महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत. या चारही मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व्यवस्थापनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.
पुण्यातही उत्सवाच्या तयारीची लगबग दिसून आली. ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, सारसबागे समोरील महालक्ष्मी मंदिर, चतुःशृंगी मंदिर, भवानी पेठेतील भवानीमाता मंदिर आदी मंदिरांमध्ये नवरात्राच्या तयारीला वेग आला आहे. या मंदिरांना रंगरंगोटी आणि आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दहाही दिवस अभिषेक, श्रीसुक्तपठण, जागर-गोंधळ, भजन-कीर्तन आदी पारंपरिक कार्यक्रमांसह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवात घरोघरी घट बसवले जातात. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या घट, परडी, माती, सप्तधान्ये, ओटीचे साहित्य तसेच पूजा साहित्य आदींच्या खरेदीसाठी स्त्रियांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या फुलांनाही मोठी मागणी होती.

घटस्थापनेचा मुहूर्त दुपारी १.४५ पर्यंत
घटस्थापना यंदा रविवारी (ता. १५) होत असून नवरात्रारंभ होत आहे. या दिवशी पहाटे पाचपासून दुपारी १.४५ पर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त आहे, असे दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितले. या दिवशी चित्रा नक्षत्र वैधृती योग असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने या मुहूर्तात घटस्थापना करण्यास हरकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवरात्राविषयी अधिक माहिती देताना दाते म्हणाले, ‘‘यंदा १९ ऑक्टोबरला ललिता पंचमी असून २१ ऑक्टोबरला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी २१ ऑक्टोबरला मध्यरात्री मिळते, त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन आहे. २२ ऑक्टोबरला महाष्टमीचा उपवास करावयाचा असून २३ ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन आणि २४ ऑक्टोबरला दसरा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे.’’

नवरात्रातील महत्त्वाचे दिवस
१५ ऑक्टोबर - घटस्थापना
१९ ऑक्टोबर - ललिता पंचमी
२१ ऑक्टोबर - महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
२२ ऑक्टोबर - दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास
२३ ऑक्टोबर - नवरात्रोत्थापना
२४ ऑक्टोबर - विजयादशमी (दसरा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com