ससून रुग्णालयातील
डॉक्टरांची चौकशी

ससून रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी

पुणे, ता. १३ : अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील ससून रुग्णालयातून पळालाच कसा, याची कसून चौकशी शुक्रवारपासून सुरू झाली. यात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका या सर्वांचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. पाटील याच्यावर नेमके कोणते उपचार सुरू होते, या बाबतची कागदपत्रे तपासण्यात येत असल्याची माहिती पुढे आली.
पाटील याच्यासह कैदी रुग्णांची ठेवलेली आलिशान बडदास्त या सगळ्या प्रकरणांची आता चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. त्या अंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नांदेड येथील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रा. हेमंत गोडबोले आणि मुंबई येथील ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचार शास्त्रविभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एकनाथ पवार हे तीन सदस्य आहेत. त्या समितीने ही माहिती घेतली. येत्या पंधरा दिवसांमध्ये त्या बाबतचा अहवाल सरकारला सादर करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या समितीने सकाळी नऊ वाजता ससून रुग्णालयात दाखल झाली. पाटील याच्या उपचाराची कागदपत्रे समितीने तपासली. तसेच, त्याच्यावर उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांचा जबाब यात नोंदविण्यात आला. परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांचीही चौकशी यात करण्यात आली, अशी माहिती मिळाली.
ससून रुग्णालयात कोणता कैदी किती दिवस उपचारासाठी दाखल होता, याची तपासणी समितीने केली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये किती कैदी रुग्ण दाखल केले, त्यांना कोणता आजार झाला होता, त्यांच्यावर उपचार काय केले, याची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.

समितीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. समितीच्या सदस्यांना चौकशीत सर्वांनी पूर्ण सहकार्य केले. तसेच, या घटनेच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांची सप्रमाण उत्तरे देण्यात आली आहेत.
- डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय
.........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com