नाटक या माध्यमाचा अधिक अभ्यास करा

नाटक या माध्यमाचा अधिक अभ्यास करा

पुणे, ता. ३ ः सकाळ करंडक एकांकिका स्पर्धेत नवीन संहिता पाहायला मिळाल्या. अनेक वैविध्यपूर्ण विषयही पाहायला मिळाले. मात्र, अनेकांचा नाटकाचा माध्यम म्हणून अभ्यास काहीसा कमी पडला. चित्रपट, वेबसिरीजचा प्रभाव असल्याने रंगमंचावर तसे प्रयोग करण्याचे प्रयत्न झाले. भविष्यात या चुका टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी नाटकाचा अभ्यास करावा आणि अधिकाधिक नाटके पाहावीत, असा सल्ला स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या परीक्षकांनी दिला.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी २६ ते ३० ऑक्टोबरला भरत नाट्य मंदिरात पार पडली. त्यासाठी परीक्षक म्हणून गार्गी फुले, नेहा शितोळे आणि नितीन धंदुके या रंगकर्मींनी काम पाहिले.
स्पर्धेविषयी निरीक्षण नोंदवताना गार्गी फुले म्हणाल्या, ‘‘संहिता, दिग्दर्शन, अभिनय आणि सादरीकरण यांची मूठ म्हणजे नाटक. पण अनेक संघांच्या सादरीकरणात केवळ सादरीकरणातील चमत्कृतींवर भर होता. काहींनी सादरीकरणाशिवाय इतर बाबींवर लक्षच दिले नाही, त्यामुळे नाटक फसले. भाषेवर देखील मेहनत घेणे गरजेचे आहे. शुद्ध किंवा अशुद्ध भाषा, असे काही नसते. मात्र बोलीभाषा आणि प्रमाणभाषा, हा फरक असतो. जर संहितेतील व्यक्तिरेखा एखाद्या विशिष्ट बोलीभाषेत संवाद साधत असेल, तर त्या अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने ती भाषा आत्मसात करायला हवी. अनुभवींचा सल्ला घ्यायला हवा.’’
नेहा शितोळे म्हणाल्या, ‘‘स्पर्धा असल्यामुळे सादरीकरणात गिमिक वापरणे किंवा काहीतरी भन्नाट दृश्यात्मक प्रयोग करणे, याकडे बहुतांश संघांचा कल होता. तो टाळता आला असता. विषयाची निवड करताना तो कालानुरूप आहे का, आपल्याला पेलणार आहे का, हे आधी विद्यार्थ्यांनी तपासून पाहायला हवे. विषयांमध्ये वैविध्य होते, पण भावनांमध्ये नव्हते. कारण निराशा, औदासिन्य, क्रौर्य आदी गोष्टींकडेच बहुतांश विषयांचा कल होता. एखादी निखळ, हलकी-फुलकी विनोदी एकांकिका पाहायला आम्हाला आवडली असती.’’

नितीन धंदुके म्हणाले, ‘‘स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेले प्रयत्न मला भावले. त्यांनी निवडलेल्या काही विषयांना खरेच दाद द्यायला हवी. पुण्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारची नाटके होत असतात. विद्यार्थ्यांनी ती नियमितपणे पाहिल्यास काय चांगले, काय वाईट, याची समज त्यांनी येईल. नाटकाची शैली समजून घेण्यास मदत होईल. तसेच भाषेवरही त्यांनी काम करण्याची गरज आहे.’’

सकारात्मक बाबी ः
- अनेक नवीन संहिता आणि नवीन विषयांचे सादरीकरण
- गूढ, सामाजिक आशय देणाऱ्या अशा विविध जॉनरची हाताळणी
- विद्यार्थ्यांना खूप वेगळ्या संकल्पना सुचल्या
- अनेक संघांनी इतर संघांच्या एकांकिका पाहिल्या, प्रोत्साहनही दिले
- नवख्या संघांनाही चांगले प्रयत्न केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com