‘अभियांत्रिकीची पदवी असणारा मजूर असू शकत नाही’

‘अभियांत्रिकीची पदवी असणारा मजूर असू शकत नाही’

Published on

पुणे, ता. ३ : अभियांत्रिकीची पदवी असणारा पती मजुरी करतो, ही बाब विश्वासार्ह वाटत नाही, असे नमूद करत न्यायालयाने पत्नीला दरमहा १२ हजार रुपये पोटगी देण्याचा अंतरिम आदेश पतीला दिला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा पती सामान्य नोकरी करतो, असे गृहीत धरले तरी त्याला २० ते २५ हजार रुपये पगार मिळतो, असे सांगत कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निकाल दिला.
अभय आणि आकांक्षा (नावे बदललेली आहेत) यांचा २०१८ ला विवाह झाला होता. पहिली मुलगी झाली म्हणून अभय आणि त्याच्या घरच्यांनी छळ केला. त्यानंतर दुसऱ्यांदा गर्भवती असताना अभय आणि त्याच्या घरच्यांनी मारहाण करून घराबाहेर काढले. दुसरी मुलगी झाल्याने अभय आणि त्याच्या घरचे मला व मुलीला भेटायला आले नाही. तसेच पतीने नांदवण्यास नकार दिला, असे पत्नीने दाखल केलेल्या पोटगीच्या दाव्यात नमूद केले. आकांक्षा यांनी स्वतःच्या आणि दोन मुलींसाठी ॲड. सुधीर मुळे, ॲड. भाग्यश्री गुजर-मुळे आणि ॲड. वृषाली नवले यांच्यातर्फे पोटगीचा अर्ज दाखल केला होता. अभय इंजिनिअर आहे. मात्र पत्नी व मुलींना पोटगी मिळू नये, यासाठी त्याने त्याच्या उत्पन्न व दायित्वाच्या शपथपत्रामध्ये तो बांधकाम मजूर असल्याचे नमूद केले आहे, असे ॲड. मुळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

उत्पन्न मिळवू शकतो
अभियांत्रिकीची पदवी असणारा व्यक्ती काहीतरी नोकरी किंवा व्यवसाय करून उत्पन्न मिळवतो, असे गृहीत धरण्यास अडचण दिसून येत नाही, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. पत्नी व दोन मुलींसाठी प्रत्येकी चार हजार रुपये अशी १२ हजार रुपये अंतरिम पोटगी अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ते दाव्याच्या अंतिम निकालापर्यंत देण्याचा आदेश पतीला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.