विद्यार्थ्यांसाठी बहुमजली वसतिगृह

विद्यार्थ्यांसाठी बहुमजली वसतिगृह

पुणे, ता. ३ ः पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी, परिचारिकांसाठी लवकरच बहुमजली व अद्ययावत सोईसुविधायुक्त वसतिगृह उभारण्यात येणार आहे. वसतिगृहाबरोबरच परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांसाठी घरेदेखील बांधण्यात येणार आहेत. यासाठी महापालिका प्रशासन ८४ कोटी रुपये खर्च करणार असून वसतिगृहाच्या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पुणे महापालिकेकडून मंगळवार पेठेत कमला नेहरू रुग्णालयाजवळ भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. पीएमसी एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालय चालविले जात आहे. पाच वर्षांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी राज्याच्या कोनाकोपऱ्यातून विद्यार्थी-विद्यार्थिनी महाविद्यालयामध्ये येत आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्‍यक परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सध्या वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली जात आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका वसतिगृह उभारणार आहे. त्यासाठी ८४ कोटी रुपये खर्च करणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

अशा आहेत सुविधा
- ८० टक्के विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय होईल, यादृष्टीने रचना
- विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र विभाग
- खोल्यांमध्ये अद्ययावत सोई सुविधा, डिजिटल लायब्ररी, उत्कृष्ट दर्जाच्या कॅन्टीनची व्यवस्था
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने इमारतीची रचना

वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी चांगल्या दर्जाचे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना वसतिगृहात चांगल्या सोई-सुविधा देऊन त्यांच्यातील गुणवत्तेला वाव देण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी देखील निवास व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.
- डॉ. शिल्पा प्रतिनिधी, अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची गरज आहे. त्यामुळे चारशे विद्यार्थ्यांच्या निवासाची चांगली व्यवस्था होऊ शकेल, यादृष्टीने वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com