पिंगोरीत गिधाड संवर्धन, प्रजनन केंद्र

पिंगोरीत गिधाड संवर्धन, प्रजनन केंद्र

पुणे, ता. ३ ः गिधाडांच्‍या संवर्धनासाठी राज्यात प्रथमच ‘गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्रा’ची (व्हीसीबीसी) स्थापना करण्यात येत आहे. इला फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या मान्यतेने फाउंडेशनचे संचालक डॉ. सतीश पांडे आणि महाराष्ट्र वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिम्ना गुप्ता यांच्यात नुकताच या संदर्भातील सामंजस्य करार झाला आहे.
या प्रसंगी पुणे वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण, डॉ. सतीश करमळकर आणि डॉ. सुरुची पांडे उपस्थित होते. हे केंद्र पुण्यातील पुरंदर तालुक्यातील पिंगोरीमधील फाउंडेशनच्या इला हॅबिटॅट येथे तयार केले जाणार आहे. हे केंद्र इला फाउंडेशनच्या ‘इला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ आणि विल्लू सी. पूनावाला वन्यजीव रुग्णालयाशी संलग्न केले जाईल.
या केंद्राच्या निर्मितीबाबत डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले, ‘‘भारतात गिधाडांच्या ‘जिप्स’ प्रजातींची संख्या गेल्या दोन दशकांमध्ये जवळपास ९९ टक्क्यांनी घटली आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर’च्या (आययूसीएन) लाल यादीनुसार सध्या नामशेष होणाच्या मार्गावर असलेल्या व धोक्यात असलेल्या पांढऱ्या पाठीचे गिधाड (जिप्स बेंगालेन्सिस) आणि भारतीय गिधाड (जिप्स इंडिका) या दोन्हींच्या संवर्धनासाठीचे प्रयत्न आणि वैज्ञानिक अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.’’
राज्यात गिधाडांच्या संवर्धन आणि प्रजननासाठी एकही समर्पित सुविधा उपलब्ध नाही. एकीकडे गिधाडांची घटती लोकसंख्या आणि दुसरीकडे जंगलात काही प्रजनन करणाऱ्या गिधाडांच्या जोडप्यांची उपस्थिती लक्षात घेता, राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी या केंद्राला सुरू करण्याची नितांत गरज असल्याचे अधोरेखित केले. हे केंद्र देशातील विविध राज्यांमध्ये गिधाडांच्या कृत्रिम अधिवासात प्रजननाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या धोरणाशी सुसंगत असेल. त्यामुळे या केंद्राच्या निर्मितीसाठी गिधाड संवर्धनातील आमचा मागील दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आणि कौशल्य लक्षात घेऊन इला फाउंडेशनला महाराष्ट्र वन विभागाशी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्याचेही डॉ. पांडे यांनी नमूद केले.

गिधाडांची संख्या धोक्यात का?
गिधाडांची संख्या घटण्यामागची विविध कारणे समोर आली आहेत. त्यामध्ये नॉन स्टेरॉईड औषधे, अधिवास नष्ट होणे, घरटे बनविण्याच्या क्षमतेवर होणारा परिणाम, विषबाधा, संवर्धन करणाऱ्यांना गिधाडांच्या प्रजननासंबंधी शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, गुरांच्या शवांची उघड्यावर विल्हेवाट लावण्यावर बंदी आदी कारणांचा यात समावेश आहे. यातील अनेक कारणे बऱ्याचदा स्वयंसेवी संस्था आणि सरकारच्या निदर्शनास आल्या आहेत.

फायदा
- या केंद्रामुळे गिधाडांची संख्या स्थिर करण्यास मदत मिळेल
- केंद्रात प्रजननाच्या माध्यमातून हळूहळू गिधाडांच्या संख्येला वाढविण्यात येईल
- भविष्यात अशा प्रकारच्या केंद्राची निर्मिती इतर ठिकाणी ही करणे शक्य होईल

‘व्हीसीबीसी’ केंद्राबाबत
- सर्वप्रथम वनविभाग व फाउंडेशनच्या तज्ञांची हरियानात सुरू केलेल्या ‘एक्स-सीटू’ प्रजनन केंद्राला भेट
- या प्रक्रियेचा अभ्यास व त्याला समजून घेणे
- इला हॅबिटॅट येथे एका वर्षात हे केंद्र कार्यान्वित होईल
- त्यामध्ये विलगीकरण क्षेत्र, तपासणी व उपचार कक्ष असेल
- गिधाडांसाठी पिंजऱ्यांची सुविधा
- शस्त्रक्रिया, क्ष-किरण (एक्स रे) सुविधा, रक्तविज्ञान आणि जैवरसायन व जनुकीय प्रयोगशाळेचाही समावेश
- इनक्युबेटर कक्ष, अन्न सुविधा, गिधाडांच्या अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांच्या पालनाची सुविधा आदींचा समावेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com