मधाचा गोडवा आणखी वाढणार

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा निर्णय ः मध व मेण खरेदीच्या हमीभावात वाढ

मधाचा गोडवा आणखी वाढणार राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा निर्णय ः मध व मेण खरेदीच्या हमीभावात वाढ

पुणे, ता. १० : मध व मेणाच्या विक्रीतून शेतकऱ्यांना मिळणारा गोडवा आता आणखी वाढणार आहे. यापुढे सेंद्रिय मध ५०० तर पश्चिम घाटातील सातेरी जातीच्या मधमाशांचे मध ४०० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केले जाणार आहे. तर मेण ३०० रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करण्याचा निर्णय राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने घेतला आहे.

हमीभावात केलेल्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. पूर्वी सेंद्रिय मध ४००, सातेरी मध ३४५ आणि मेण १७० रुपये किलो दराने खरेदी केले जाते. मंडळाची मध केंद्र योजना राज्यात सुरू असून लाभार्थींना मधमाशा पालनाचे दहा व वीस दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. तसेच पन्नास टक्के अनुदानात मधमाशांच्या वसाहतीसह मधपेट्या दिल्या जातात. त्यात तयार होणारे मध व मेण खरेदीची हमी देखील दिली जाते. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी मंडळाने राज्यात गेल्या वर्षी ६४ जनजागृती मेळावे घेतले होते. यंदा १०० मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

‘मधुबन’ नावाने मध विक्री
मधपाळ शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मधाचे ब्रँडिंग व पॅकेजिंग करून ‘मधुबन’ या नावाने हा मध विकले जात आहे. या मधामध्ये जांभूळ मध, सूर्यफूल मध, सेंद्रिय मध आणि ओव्याचे मध अशी प्रतवारी करून विक्री करण्यात येते. मध व मेण खरेदीची हमी मंडळाने घेतली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी व बेरोजगार तरुण व महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन मधमाशा पालन करावे, असे आवाहन साठे यांनी केले.

राज्यातील मध उद्योगाला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी मध व्यवसायाकडे वळावे, यासाठी खादी व ग्रामोद्योग मंडळाने मध व मेण खरेदीचा हमीभाव जाहीर केला आहे. देशात कोणतेही राज्य सरकार मध व मेण खरेदीची हमी देत नाही. मात्र, आपल्या राज्यात केवळ हमीच नाही तर सर्वात जास्त भावाने मधमाशा पालनातील उत्पादने मधमाशा पालकांकडून खरेदी केली जातात.
- रवींद्र साठे, सभापती, राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com