गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पुणे : सासरच्या छळास कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली. पूजा प्रणव काळे (वय २७, रा. फुरसुंगी हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील किशोर खेडकर (वय ५०, रा. नावेड, भातकुली, जि. अमरावती) यांनी फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिसांनी पती प्रणव रामदास काळे (वय ३०, मूळ रा. मलकापूर, जि. अमरावती) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती प्रणव काळे हा त्याची पत्नी पूजाला माहेरहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करीत होता. पूजाने त्याला नकार दिला. त्यामुळे पती आणि त्याच्या नातेवाइकांकडून तिला त्रास देण्यात येत होता. त्याला कंटाळून पूजाने आठ एप्रिल रोजी रात्री आत्महत्या केली. याप्रकरणी पतीसह त्याच्या नातेवाइकांविरुध्द हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


आनंदनगरमध्ये घरफोडी लाखांचा ऐवज लंपास
पुणे : सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर येथील सदनिकेतून चोरट्यांनी सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरी केला. ही घटना शुक्रवार (ता. ७) ते शनिवार यादरम्यान घडली. याप्रकरणी स्वप्नील हाडके (वय ३६, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिंहगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबे विक्रेत्यांचे डझनभर मोबाईल चोरी
पुणे : मार्केटयार्ड येथे आंबा महोत्सवासाठी आलेल्या विक्रेत्यांचे १२ मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. ९) पहाटे घडली. याप्रकरणी अक्षय थोटम (वय २७, रा. हुर्शी, देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून मार्केटयार्ड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विक्रेत्यांनी आंबा महोत्सवात स्टॉल लावले होते. रात्री उशीजवळ मोबाईल ठेवून झोपी गेले होते. त्यावेळी चोरट्याने आंबा विक्रेत्यांचे १२ मोबाईल लंपास केले.

टेम्पोच्या धडकेने तरुणाचा मृत्यू
पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेने एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील शेवाळवाडी भाजी मार्केटसमोर शुक्रवारी (ता. ८) रात्री घडली. हृषिकेश बाबासाहेब डोंगरे (वय २०, रा. शिवचैतन्य कॉलनी, शेवाळवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वडील बाबासाहेब डोंगरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या बॅगमधून दागिने चोरी
पुणे : लक्ष्मी रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेच्या बॅगमधून ९३ हजारांचे सोन्याचे गंठण चोरट्याने लांबविले. ही घटना शनिवारी (ता. ९) दुपारी दोनच्या सुमारास घडली. याबाबत एका महिलेने (वय २२, रा. आदर्शनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला रस्त्याने जात होती. त्यावेळी चोरट्याने महिलेच्या पाठीवर असलेल्या बॅगच्या बाहेरील कप्प्यातील छोट्या पर्समधून सोन्याचे गंठण लांबवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com