ग्रह व नक्षत्रांच्या विश्वात नजरेने फेरफटका

ग्रह व नक्षत्रांच्या विश्वात नजरेने फेरफटका

आकाशनिरीक्षकांसाठी एप्रिल महिन्यातील आकाश ही पर्वणी असते. वळवाचा पाऊस व ढगाळ वातावरणाचा अपवाद वगळता आकाश निरभ्र असते. दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्रीची शीतलता अनुभवत आकाश न्याहाळणे सुखद वाटते. पुण्यातील सोनल थोरवे ही तरुणी
आकाशनिरीक्षणाचे धडे मुले व मोठ्यांनाही देत असते.
सोनलने सांगितले की, आपल्या घराच्या गच्चीवर किंवा अंगणात उभे राहून जेवढे आकाश दिसते, तेवढे तरी रोज काही वेळापुरते पाहणे आनंदाचे ठरू शकते. थोड्या थोड्या दिवसांनी आकाशात दिसणाऱ्या ग्रहांच्या जागा बदलताना दिसतात. याचबरोबर ते उगवण्या- मावळण्याच्या वेळांमध्येही बदल आढळतो. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे आकाशातील चित्र बदलताना दिसते. सध्या पश्चिम क्षितिजाकडे संध्याकाळी शुक्र ठळकपणे दिसतो. त्याच्या वरच्या बाजूला आठच्या सुमारास मंगळ दिसतो. आकाशातील अनेक दीर्घिकांपैकी आपल्या दीर्घिकेचे नाव आकाशगंगा. हिचा आतला पट्टा (सॅजिटॅरिअस), धनू राशीतून जाणारा तर बाहेरचा पट्टा (ओरायन) हा मृग नक्षत्राकडून जाताना दिसतो. गावाबाहेरच्या अंधाऱ्या जागेवरून सॅजिटॅरिअस हा उत्तररात्री दिसू लागतो. ओरायन हा पहाटे पहाटे दिसतो. सध्या दक्षिणेकडे एका रेषेत तीन तारे व त्यांच्या भोवती चार ताऱ्यांची आयताकृती दिसते. हे मृग नक्षत्र. याच्यापासून एक काल्पनिक रेषा ओढून दक्षिणपूर्वेकडे नेल्यास अत्यंत तेजस्वी असा व्याध हा तारा दिसतो. उत्तरपूर्वेकडे सप्तर्षी व तेथून काल्पनिक रेष क्षितिजाकडे नेल्यास आपल्याला मंद लुकलुकणारा ध्रुव तारा दिसतो. याची जागा कधीच बदलत नाही. याच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला चमचमणारा व्याध. आकाशात वर्षभरातील निरनिराळ्या कालावधीत व एकाच रात्रीचा एक एक प्रहर सरताना बदलत जाणारे हे अद्‍भुत नाट्य अवश्य पहा. प्रत्येक महिन्यातील चंद्राचे वेगवेगळे स्वरूपही अनुभवा. आपली सृष्टी भरभरून नवलाईचा आनंद देत असते.

सुट्टीचा काळ चांगला
आकाशनिरीक्षणाबद्दल आबालवृद्धांना कुतूहल असते. बुजुर्ग मंडळी आकाशात दिसणाऱ्या नक्षत्रांबाबत पारंपरिक कथा सांगतात. एप्रिल महिना हा आकाशनिरीक्षण करणाऱ्या अनुभवी व हौशींसाठीही पर्वणी ठरतो. शहरी भागांत सभोवताली कृत्रिम उजेडाचा मारा रात्रभर असल्याने आकाशातील मंद प्रकाशित ग्रह, तारे बघायला अडसर येतो. सुट्टीचा हा काळ शहरापासून दूर, मोकळ्या आकाशातील ग्रह, नक्षत्रे निरखायला फारच चांगला, सोनलने सांगितले.

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (IISER) आयराइज (iRISE) प्रकल्पांतर्गत विज्ञान शिक्षण तांत्रिक अधिकारी म्हणून मी काम करते. खगोल विज्ञान हा माझा आवडीचा विषय आहे. सर्वसामान्यांना याचा परिचय मी ‘आयुका’मधील सेवेदरम्यान केला. खगोलविश्व या संस्थेसाठी हे काम मी दीर्घकाळ सातत्याने करत आहे.
- सोनल थोरवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com