क्षण बहराचे

क्षण बहराचे

मराठीत गझलेत स्वतःची अव्दितीय नाममुद्रा उमटवणारे गझलसम्राट सुरेश भट यांचा १५ एप्रिल हा जन्म दिवस. भटांनी गझल सादरीकरणाचे कार्यक्रम सर्वत्र केले असताना शाहीर सुरेशकुमार वैराळकर हे सूत्रसंचालन करायचे. भटांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैराळकरांनी गझल मंच स्थापन करून नव्या पिढीतील मराठी गझलकारांना सातत्याने रसिकांसमोर आणले आहे.


गझल परंपरेतून जपल्या सुरेश भट यांच्या आठवणी!

गझलसम्राट सुरेश भट. १९३२ मध्ये जन्मलेल्या भटांचा शनिवारी आज (शनिवारी) ९१वा जन्मदिन आहे. त्यांच्या ‘रंग माझा वेगळा’ या कार्यक्रमाच्या सत्तर भागांचे निवेदन करणारे शाहीर सुरेशकुमार वैराळकर म्हणाले, ‘‘त्यांच्या सहवासातून माझ्यावर कविता व गझल विषयक संस्कार झाले. जगण्याला अर्थ देणारी मूल्ये कळली. स्वतःच्या जीवनाबाबतची माझी भूमिका निश्चित झाली. भटांनी एका गझलेत म्हटले आहे,
‘जगी या वर्तमानाला
कळेना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या
पिढ्यांशी बोलतो आम्ही’...
मराठीत गझलरचना करणारे आधीही होऊन गेलेत. परंतु बहुतेकांनी गझलेच्या आकृतिबंधात भावकविता लिहिल्या. भटांना मराठी गझलेचे खलिफा मानले जाते, कारण त्यांनी मूळच्या या अरबी-फारसी काव्य प्रकाराचे यम, नियम, व्याकरण पाळून गझल लिहिली. त्यांनी सुरवातीला तास-सव्वा तासाचे गझल सादरीकरणाचे प्रयोग सुरू केल्यावर गावोगावचे नवोदित गझलकार त्यांना भेटू लागले. आपापल्या रचना ऐकवून मार्गदर्शन मागू लागले. भटांनी या संदर्भात ‘गझलेची बाराखडी’, हा लेख लिहिला. नंतर त्याची स्वखर्चाने पुस्तिका प्रकाशित केली. यानंतर मराठीत गझलकारांचे प्रमाण वाढू लागले. भटांभोवती कायम त्यांचा गराडा असे. १४ मार्च २००३ मृत्यूनंतर या मंडळींना आपला आधार गेल्यासारखे वाटू लागले. कविसंमेलनांमध्ये त्यांना दुय्यम वागणूक मिळे. भटांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी १९ एप्रिल २०१२ रोजी गझलमंचाची स्थापना केली. गोव्यात झालेल्या पहिल्या मुशायऱ्यानंतर आणखी चार तेथेच झाले. नंतर महाराष्ट्राच्या चोवीस जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सातत्याने कार्यक्रम झाले. यात आतापर्यंत १८० शहरी व ग्रामीण भागांतील स्त्री - पुरुष तरुणांच्या दर्जेदार रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या. शनिवारी (१५ एप्रिल) पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात सायंकाळी ६.३०. वाजता १३० वा मुशायरा होणार असून यात सात महिला गझलकार सहभागी असतील.

रचनांची पारायणे केल्याने तोंडपाठ
शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी सांगितले की, भटांच्या ‘रूपगंधा’ या काव्यसंग्रहानंतर तब्बल तेरा वर्षांनी १९७४ मध्ये ‘रंग माझा वेगळा’ हा दुसरा संग्रह प्रकाशित झाला. यानंतर त्यांचे कार्यक्रम लोकप्रिय होत असूनही आठ वर्षे नवीन संग्रह नव्हता. रसिकांच्या मागणीवरून नव्या गझलांचा संग्रह काढायचे ठरले. सूत्रसंचालनासाठी मी त्या रचनांची पारायणे केली असल्याने त्या मला तोंडपाठ झाल्या होत्या.

संग्रहासाठी भटांनी तयार केलेली मुद्रणप्रत रिक्षातच राहिली. भरपूर शोध घेऊनही ती मिळेना. तेव्हा मी स्मरणशक्तीच्या भरवशावर त्या रचना त्यांना लिहून दिल्या. तुरळक शब्दांमध्ये फेरफार करून ती संहिता छापली गेली. ‘एल्गार’ या शीर्षकाने प्रकाशित या संग्रहाच्या मनोगतात भटांनी याचे श्रेय मला दिले आहे. माझ्या आयुष्यातील हा लाखमोलाचा ठेवा आहे.
- शाहीर सुरेशकुमार वैराळकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com